नवी मुंबईत मे महिन्यात होणार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजचे भूमिपूजन

By योगेश पिंगळे | Published: November 20, 2023 04:45 PM2023-11-20T16:45:59+5:302023-11-20T16:49:38+5:30

नार्वेकर यांनी मे महिन्याच्या शुभ मुहर्तावर सदर हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजचे भूमिपूजन करणार असल्याचे त्यांनी अंतिम बैठकीत सांगितले.  

Bhumi Pujan of Super Specialty Hospital and Medical College will be held in May | नवी मुंबईत मे महिन्यात होणार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजचे भूमिपूजन

नवी मुंबईत मे महिन्यात होणार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजचे भूमिपूजन

नवी मुंबई : आजही सर्व सामान्य व गरजू रुग्णांना आरोग्य सेवा मिळण्यासाठी अनंत अडचणींना सामोरे जावे लागत होते. बुद्धीमत्ता असूनही तरुणांना डॉक्टरकी मिळण्यापासून वंचित राहावे लागत होते. आमदार मंदा म्हात्रे यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजसाठी शासनाकडे पाठपुरावा करून मंजुरी मिळवली आहे. लवकरच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजची वास्तू उभी राहणार असून यामुळे रुग्णांना तसेच वैदकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणांना  मोठा लाभ मिळणार आहे. या अनुषंगाने सोमवारी महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या दालनात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजचे अंतिम सादरीकरण करण्यात आले. यावेळी नार्वेकर यांनी मे महिन्याच्या शुभ मुहर्तावर सदर हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजचे भूमिपूजन करणार असल्याचे त्यांनी अंतिम बैठकीत सांगितले.  

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज हे 8.40 एकरामध्ये उभारला जाणार असून अंदाजे 819.30 ते 850 कोटी खर्च येणार आहे. हॉस्पिटलमधील रुग्णाची क्षमता ही 500 बेड हून अधिक असून हॉस्पिटल पूर्णत: सर्व सुविधायुक्त बनणार असल्याचे आमदार म्हात्रे यांनी सांगितले. सदर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलवर पूर्ण नियंत्रण हे नवी मुंबई महानगरपालिकाचे असणार आहे. तसेच लवकरच सिडको प्राधिकरण यांच्या बरोबर करार होणार असून निविदा प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकार, सिडको आणि महापालिकेकडून लागणाऱ्या सर्व मान्यता आणि मंजुरी, परवानग्या मिळाल्याने निविदा प्रकियेला नवी मुंबई महापालिकेकडून सुरुवात होणार आहे. हॉस्पिटलच्या सात माजल्यांच्या इमारतीमध्ये 400 हून अधिक वाहनाच्या पार्किंगची वाहन व्यवस्था केली जाणार असून हृदय, मेंदू अश्या अनेक मोठ मोठ्या आजारांवर सेवा दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज हे नवी मुंबईकरांसाठी क्रांती ठरेल. 

तसेच नवी मुंबई हद्दीतील रुग्णांना उपचाराकरिता बाहेर जाण्याची गरज भासणार नाही. यामुळे रुग्णांचा वेळ व पैसा वाचणार असून स्थानिक नागरिकांना रोजगार निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या एक वर्षापासून या कामासाठी जो लढा सुरु होता त्या लढ्याला खऱ्या अर्थाने एक प्राप्त स्वरूप महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, सिडको व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी व नवी मुंबई महानगरपालिका, सिडको मधील संबंधित अधिकाऱ्यांनी दिला त्याबद्दल सर्व अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ, उपायुक्त राहुल गेठे, सहाय्यक नगररचना अधिकारी सोमनाथ केकाण, शहर अभियंता संजय देसाई, वैदकीय आरोग्य अधिकारी प्रशांत जवादे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

वसतिगृहासह इतर सुविधा 

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज सोबत पीजी, नर्सिंग शैक्षणिक वस्तीगृह, पदव्युत्तर शैक्षणिक संकुल, अभियांत्रिकी यार्ड, रूग्णासोबत येणाऱ्या नातेवाईकांना राहण्यासाठी धर्मशाळा, नर्सिंग वस्तीगृह, अभ्यागत केंद्र, पदव्युत्तर वस्तीगृह, व इतर अनेक सुख-सुविधा उपलब्ध होणार असल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Bhumi Pujan of Super Specialty Hospital and Medical College will be held in May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.