निवडणुकीपूर्वीची आचारसंहिता म्हणजे काय, त्याचे नियम कोणते? समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 11:59 AM2024-03-16T11:59:43+5:302024-03-16T12:00:45+5:30

लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच संपूर्ण देशात एकाच वेळी आचारसंहिता लागू होते. या अंतर्गत राजकीय पक्षांव्यतिरिक्त इतर लोकांवर अनेक निर्बंध आहेत.

What is pre-election code of conduct, what are its rules | निवडणुकीपूर्वीची आचारसंहिता म्हणजे काय, त्याचे नियम कोणते? समजून घ्या

निवडणुकीपूर्वीची आचारसंहिता म्हणजे काय, त्याचे नियम कोणते? समजून घ्या

देशात लोकसभा निवडणूका जाहीर होणार आहेत. आज केंद्रीय निवडणूक आयोग दुपारी ३ वाजता निवडणुकीची घोषणा करणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम केले आहेत,याचे  पालन सर्व राजकीय पक्षांनी करावे लागते. याशिवाय आचारसंहितेत अनेक निर्बंधांचा समावेश आहे, त्याचे उल्लंघन झाल्यास निवडणूक आयोग कठोर कारवाई करू शकते. उमेदवार अपात्रही होऊ शकतो.

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केंद्रानेही मोठ्या प्रकल्पांना दिली मंजूरी; मध्यरात्री घेतले निर्णय

निवडणुकीची घोषणा होताच आचारसंहिता लागू होते. विधानसभा निवडणुका झाल्या तर ते संपूर्ण राज्याला लागू होते. लोकसभा निवडणुकीच्या काळात संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू होते. निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत ही आचारसंहिता लागू राहते. या काळात अनेक अधिकार निवडणूक आयोगाच्या हातात जातात.

आचारसंहितेचे नियम काय असतात?

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारी पैसा कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा व्यक्तीच्या फायद्यासाठी वापरता येत नाही. याशिवाय निवडणूक प्रचारात सरकारी वाहने, बंगले, विमान किंवा सरकारी सुविधांचा वापर करता येत नाही. आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणतीही सरकारी घोषणा, पायाभरणी किंवा उद्घाटन होत नाही. याशिवाय कोणतीही रॅली किंवा जाहीर सभा घेण्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक आहे. निवडणूक रॅलींमध्ये पैसा, धर्म, जात यांच्या नावावर मते मागणे पूर्णपणे निषिद्ध आहे. निवडणुकीशी कोणत्याही प्रकारे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत नाहीत. त्यासाठी गरज भासल्यास निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते.

आचारसंहितेच्या काळात मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमात सरकारी खर्चाच्या जाहिरातींवर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत लाऊडस्पीकर वापरण्यास मनाई आहे. याशिवाय राजकारणी मंदिरे, मशिदी किंवा इतर प्रार्थनास्थळांचा निवडणूक प्रचारासाठी वापर करु नये.

बॅनर लावण्यासाठी मालकाची परवानगी घेणे आवश्यक 

आचारसंहितेच्या नियमांनुसार मतदानाच्या ४८ तास आधी निवडणूक प्रचार थांबतो. याशिवाय कोणत्याही व्यक्तीच्या जमिनीवर, इमारतीच्या किंवा जागेच्या भिंतींवर ध्वज किंवा बॅनर लावण्यासाठी मालकाची परवानगी घेणे आवश्यक आहे. निवडणुकीच्या दिवशी मतदारांना दिलेल्या स्लिप्स साध्या कागदावर असल्याची खात्री राजकीय पक्षांना करावी लागते. त्यावर उमेदवाराचे कोणतेही चिन्ह किंवा नाव लिहिलेले नसावे. मतदारांशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीने बूथमध्ये प्रवेश करू नये. 

Web Title: What is pre-election code of conduct, what are its rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.