ध्येय गाठण्यासाठी कठोर मेहनतीला पर्याय नाही : उपराष्ट्रपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 05:48 AM2018-06-27T05:48:08+5:302018-06-27T05:48:15+5:30

There is no substitute for hard work to achieve the goal: Vice President | ध्येय गाठण्यासाठी कठोर मेहनतीला पर्याय नाही : उपराष्ट्रपती

ध्येय गाठण्यासाठी कठोर मेहनतीला पर्याय नाही : उपराष्ट्रपती

Next

नवी दिल्ली : कोणत्याही क्षेत्रात उच्चपदावर जाण्याचे स्वप्न तुमच्या मनात जरूर असेल मात्र कठोर परिश्रमाशिवाय ते शक्य नाही. एक बाब कायम लक्षात ठेवा, आयुष्यात जाणीवपूर्वक केलेल्या मेहनतीला कोणताही पर्याय नाही. शेतकऱ्याच्या सामान्य कुटुंबात माझा जन्म झाला. लहानपणी शाळेत जाण्यासाठी दररोज ६ किलोमीटर पायी चालावे लागायचे. शिक्षणासाठी परिश्रम खूप झाले, मात्र आयुष्यात फार मोठी स्वप्न कधी पाहिली नव्हती. तरीही मेहनतीच्या बळावर भारताच्या उपराष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलो, असे प्रतिपादन भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी उपराष्ट्रपती निवासाच्या प्रांगणातील सरदार पटेल सभागृहात केले.

लोकमततर्फे आयोजित राजधानी दिल्लीच्या हवाई सफर स्पर्धेतील विजेत्या निवडक ३७ विद्यार्थी विद्यार्थीनींच्या पथकासमोर उपराष्ट्रपती बोलत होते. महाराष्ट्र व गोव्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून एक याप्रमाणे या विद्यार्थ्यांची प्रतिवर्षाप्रमाणे निवड करण्यात आली होती.
विद्यार्थ्यांशी हितगुज साधतांना उपराष्ट्रपती नायडू म्हणाले, आपले माता पिता, आपली मातृभाषा, आपले जन्म गाव, आपली मातृभूमी भारतमाता व ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले ते गुरू या ५ गोष्टी अन् व्यक्तिंचा आयुष्यात कधीही विसर पडू देऊ नका. भारतभूमीचा हा अलौकिक संस्कार आयुष्यात तुमचे मन सतत संवेदनशील ठेवील.
तासभराच्या या वैशिष्ठ्यपूर्ण भेटीत दिल्लीत आलेल्या विद्यार्थी विद्यार्थींनींनी उपराष्ट्रपतींना अनेक प्रश्न विचारले आपल्या दिलखुलास शैलीत उपराष्ट्रपतींनी त्याची मनमोकळी उत्तरेही दिली ती अशी...
मोठे झाल्यावर आपण काय बनावे
असे लहानपणी तुमच्या मनात होते?
आयुष्यात आपल्याला नेमके काय व्हावेसे वाटते, याविषयी लहानपणी फार उदात्त व भव्यदिव्य कल्पना नव्हत्या. सामान्य कुटुंबात वाढलो. वय वर्षभराचे असतांनाच आई स्वर्गवासी झाली. माझे संगोपन आजी आजोबांनीच केले. त्यांच्या सान्निध्यात असतांना वाटायचे की आयुष्यात आपल्याला वकील बनता आले पाहिजे.
शाळेत असतांना आपल्याला अवघड विषय अन् अभ्यासाची भीती वाटायची काय? कोणता विषय तुम्हाला सर्वाधिक आवडायचा?
उत्तर : शाळेत असतांना अनेकदा अभ्यासात मन लागत नसे, झाडांवर चढायला, विहीर अथवा तलावात डुंबायला खूप आवडायचे. या छंदांसाठी अनेकदा शाळा बुडवली मात्र कालांतराने लक्षात आले की आयुष्यात कोणतेही उद्दिष्ट गाठायचे असेल तर शिक्षण सर्वात महत्वाचे आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शाळेत असतांना इतिहास हा माझा सर्वात आवडता विषय होता.
लोकमत दिल्लीच्या उद्घाटनप्रसंगी आपण म्हणालात ‘खरे ज्ञान मातृभाषेतच प्राप्त होते’ तथापि जगभरात सध्या इंग्रजी भाषेची चलती आहे. इंग्रजीच्या ज्ञानाशिवाय जगाच्या स्पर्धेत आम्ही कसे टिकणार?
तुम्हा सर्वांची मातृभाषा मराठी अथवा कोकणी आहे माझी तेलुगु आहे. माझे शिक्षण तेलगु भाषेत झाले तरी आजतागायत काही अडले नाही. मातृभाषेच्या जोडीला अन्य भाषाही कालांतराने शिकता येतात. मी दक्षिण भारतातला आहे. तिथे हिंदी भाषेला विरोध असायचा. कालांतराने लक्षात आले की देशभर हिंडायचे असेल, लोकांशी संवाद साधायचा असेल तर हिंदीशिवाय पर्याय नाही. तरीही मातृभाषेचा विसर मी कधी पडू दिला नाही. मातृभाषेकडे दुर्लक्ष करणे कदापि योग्य ठरणार नाही.
शाळेत आम्ही मस्ती करतो, अनेकदा गुरूजनांचे ऐकत नाही तेव्हा ते चिडतात, आम्हाला रागावतात. संसदेत जेव्हा खासदार हंगामा करतात तेव्हा आपल्याला राग येत नाही काय?
येतो नां, विनाकारण गोंधळ घालणाºयांचा नक्कीच राग येतो, तथापि ते लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्या गोंधळामागचे कारण समजावून घेण्याचा मी प्रयत्न करतो, त्यांना शांत रहाण्याची विनंती करतो.
शाळेत आम्ही दंगामस्ती केली की शिक्षक आम्हाला शिक्षा करतात, सभागृहात दंगामस्ती करणाºयांना तुम्ही शिक्षा का करीत नाही?
(प्रश्नक र्त्या विद्यार्थ्याकडे मिस्किल नजरेने पहात) मी कोणती शिक्षा त्यांना करावी, तुझा काय सल्ला आहे? (सभागृहात हास्यकल्लोळ). मग काहीशा गंभीर स्वरात नायडू म्हणाले, गोंधळ घालणाºयांचे सभागृहात मी नाव पुकारतो. त्यांना ताकीद देतो, अगदीच वेळ आली तर कधीतरी त्यांना सभागृहाबाहेर काढावे लागते.
आयुष्यात आपल्यासमोर कोणाचा तरी आदर्श असला पाहिजे लहानपणी तुमचे आदर्श कोण होते?
माझे आजोबा माझे रोल मॉडेल होते. सर्वांची कामे ते मनापासून करायचे. गावातले अनेकजण त्यांचा सल्ला घ्यायला यायचे.
देशाचा पंतप्रधान बनायचे असेल तर मला काय करावे लागेल?
प्रश्नक र्त्याकडे रोखून पहात सर्वप्रथम त्याचे नाव व जिल्हा उपराष्ट्रपतींनी विचारला. मग त्याला उद्देशून मिस्किलपणे म्हणाले, पंतप्रधानपदी सध्या मोदीजी आहेत. आणखी काही काळ तरी त्यांना राहू द्या.(प्रचंड हास्यकल्लोळ) तुम्हाला कल्पना असेलच की मोदी लहानपणी रेल्वे स्थानकावर चहा विकायचे. दिवंगत राष्ट्रपती अब्दुल कलाम लहानपणी घरोघरी वृत्तपत्रे टाकायचे. कठोर परिश्रमाशिवाय आयुष्यात काहीही साध्य करता येत नाही. मनात आत्मविश्वास असेल तर जन्म सामान्य कुटुंबात झाला तरी उच्चपदावर पोहोचता येते. तुम्ही लोकांशी कसे वागता, लोकसंग्रह कसा करता, यावर बरेच काही अवलंबून असते. जनतेची मने जिंकण्याचे कसब अंगी असेल, नशिबाने साथ दिली अन् प्रचंड मेहनत करायची तयारी असली तर कोणतेही पद आयुष्यात मिळवता येते.
या अविस्मरणीय भेटीत उपराष्ट्रपतींना प्रश्न विचारणाºया विद्यार्थ्यांमधे रितेश दायडे (नांदेड) श्रध्दा वाघमारे (लातूर) विशाल थोरात (जळगाव) राजलक्ष्मी भोसले (उत्तर गोवा) आकांक्षा माळी (कोल्हापूर) हर्षवर्धन खाडे (रत्नागिरी) आयुष
इंगोले (अमरावती) अंकिता धोंड (दक्षिण गोवा) यांचा समावेश होता. त्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपालसिंग यांची
भेट घेतली. लोकमत समूहाचे
वसंत आवारी व अन्य अधिकारी त्यांच्यासोबत होते.
तत्पूर्वी सफदरजंग मार्गावरील इंदिरा गांधी स्मृती व तीस जनवरी मार्गावरील महात्मा गांधी स्मृती स्थळाला भेट दिली. मुंबई व नागपूर विमानतळावरून दिल्लीला आलेल्या मुलांनी राजपथावरील इंडिया गेट परिसरात हिंडण्याचाही आनंद लुटला.

Web Title: There is no substitute for hard work to achieve the goal: Vice President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.