माझ्या कार्यकाळात राज्यात एकही दंगल नाही- योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 07:06 PM2019-01-03T19:06:17+5:302019-01-03T19:10:41+5:30

राज्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणल्याचा योगींचा दावा

There are no riots in the state during my tenure says up cm Yogi Adityanath | माझ्या कार्यकाळात राज्यात एकही दंगल नाही- योगी आदित्यनाथ

माझ्या कार्यकाळात राज्यात एकही दंगल नाही- योगी आदित्यनाथ

लखनऊ: उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. मात्र गेल्या दोन वर्षांमध्ये उत्तर प्रदेशात एकही दंगल न झाल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. योगींनी एकापाठोपाठ एक असे सात ट्विट करून आपल्या 21 महिन्यांच्या कारकिर्दीचं कौतुक करत स्वत:ची पाठ थोपटली आहे. राज्यातील संघटित गुन्हेगारी आटोक्यात आणल्याचा दावादेखील त्यांनी केला.


 

माझ्या कार्यकाळात राज्यात एकही दंगल झाली नाही. गेल्या 2 वर्षात राज्यात कायद्याचं राज्य आलं, असा दावा योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरवरून केला. 'माझ्या कारकिर्दीत लोकांचा उत्तर प्रदेशबद्दलचा दृष्टीकोन बदलला. उत्तर प्रदेश म्हणजे भ्रष्टाचार, अराजकता आणि दंगली असा लोकांचा समज होता. फक्त देशातीलच नव्हे, तर परदेशातील लोकांचा उत्तर प्रदेशकडे पाहण्याचा दृष्टीकोन फारसा चांगला नव्हता. मात्र आता त्यात आमूलाग्र बदल झाला आहे,' असं योगींनी त्यांच्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं. यानंतरच्या ट्विटमध्ये त्यांनी स्वत:च्या कारकिर्दीचं कौतुक केलं. मार्चमध्ये माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीला दोन वर्ष पूर्ण होतील. या काळात एकदी दंगल झालेली नाही, असा दावा योगींनी केला. 




महिन्याभरापूर्वी गोहत्येच्या संशयावरुन उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात एका पोलीस अधिकाऱ्याची जमावानं हत्या केली होती. याशिवाय अनेक ठिकाणी तथाकथित गोरक्षकांनी धुमाकूळ घातला. यावरुन विरोधकांनी योगी सरकारवर जोरदार टीका केली होती. मात्र आपल्या कार्यकाळात गुन्हेगारीला आळा बसल्याचा दावा योगींनी केला. 'आम्ही संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवलं आहे. उत्तर प्रदेशात कायद्याचं राज्य आहे. कौटुंबिक वाद सोडले तर उत्तर प्रदेश पूर्णपणे सुरक्षित आहे,' असं योगींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

Web Title: There are no riots in the state during my tenure says up cm Yogi Adityanath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.