"जग उपकारांवर चालत नाही"; परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे मालदीव मुद्द्यावर सडेतोड मत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 08:08 PM2024-02-26T20:08:16+5:302024-02-26T20:09:25+5:30

"आज जगाला भारताकडून अपेक्षा आहेत, पूर्वी तसे चित्र दिसत नव्हते"

The world does not run on favors Foreign Minister S Jaishankar slams Maldives issue | "जग उपकारांवर चालत नाही"; परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे मालदीव मुद्द्यावर सडेतोड मत

"जग उपकारांवर चालत नाही"; परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे मालदीव मुद्द्यावर सडेतोड मत

S Jaishankar, India Maldives: भारत आणि मालदीव या दोन देशांमधील संबंध गेल्या काही दिवसांपासून थोडेसे तणावपूर्ण झाले आहेत. मालदीवच्या सत्ताधारी पक्षातील काही नेतेमंडळींनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आणि भारत देशाबाबत आक्षेपार्ह विधाने केली. त्यानंतर भारतीयांनी मालदीवला पर्यटनासाठी न जाण्याचा ट्रेंड सुरू झाला. याच दरम्यान आज परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारत आणि मालदीव यांच्यातील संबंधांवर आपले सडेतोड मत व्यक्त केले आहे. "जग हे कृतज्ञता आणि उपकारावर चालत नाही. माणुसकी ही माणुसकी असते, मुत्सद्दीपणा हा मुत्सद्दीपणा असतो आणि राजकारण हे राजकारणच असते. सगळे जग एकमेकांच्या उपकाराच्या भरोशावर चालू शकत नाही," असे रोखठोक मत जयशंकर यांनी मांडले.

"मालदीवमध्ये भारताची दोन हेलिकॉप्टर आहेत. ती मुख्यत्वे वैद्यकीय कारणांसाठी वापरली जातात. त्याचा फायदा मालदीवलाच मिळत आहे. पण कधी कधी लोकांची दिशाभूल होते. तसे होऊ नये त्यावर नक्कीच उपाय शोधायला हवा," असे जयशंकर म्हणाले. तसेच, टीव्हीनाइनच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समिटमध्ये बोलताना पुढे ते म्हणाले, "सर्व देशांनी एक बाब लक्षात ठेवायला हवी की, माणूसकी ही माणूसकी असते. त्याची राजकारणाशी सळमिसळ करू नये. कारण राजकारणात मुत्सद्दीपणा येतो आणि त्यावर पूर्ण जगाचे चक्र चालते. उपकारावर आणि एकमेकांप्रति कृतज्ञता भाव दर्शवून जग चालत नाही."

"दहा वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले आणि त्या वेळी देशाच्या अर्थव्यवस्थेवर नजर टाकली तर आपण ११ व्या क्रमांकावर होतो. आज आपण जगात पाचव्या स्थानावर आहोत. आज भारताची गणना जगातील बलाढ्य देशांमध्ये केली जाते. जगात एखादी मोठी बैठक झाली तर त्यात भारताने दिलेल्या कल्पनांवर विचार केला जातो. कारण आज जगाला भारताकडून अपेक्षा आहेत. पूर्वी हे चित्र तसे नव्हते पण मोदींच्या नेतृत्वामुळे आता लोक भारताकडून आशादायी आहेत," असा विश्वास जयशंकर यांनी व्यक्त केला.

"गेल्या १० वर्षांत जगात अनेक प्रकारची संकटे आली. एक काळ असा होता की जेव्हा जगात कोणतीही दुर्घटना घडायची तेव्हा आधी पाश्चात्य देश पुढे यायचे पण आता जग बदलले आहे. सर्व देश स्वतःला बळकट करत आहेत. सर्व देश आता आपापली ताकद ओळखून आहेत आणि सामर्थ्य वाढवण्यात व्यस्त आहेत. म्हणूनच आज जगात कोणतीही गोष्ट घडली तर भारत सर्वात आधी गोष्टी नीट करण्यासाठी पुढाकार घेतो," हा महत्त्वाचा मुद्दाही त्यांनी अधोरेखित केला.

Web Title: The world does not run on favors Foreign Minister S Jaishankar slams Maldives issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.