तेलंगणात भाजपाचा 'एकटा टायगर', टी. राजासिंगनं गोशामहल जिंकलं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 04:36 PM2018-12-11T16:36:23+5:302018-12-11T16:44:16+5:30

तेलंगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचार सभा घेतल्या.

T. Raj Singh won from goshamahal constituency in telangana | तेलंगणात भाजपाचा 'एकटा टायगर', टी. राजासिंगनं गोशामहल जिंकलं

तेलंगणात भाजपाचा 'एकटा टायगर', टी. राजासिंगनं गोशामहल जिंकलं

Next

हैदराबाद - तेलंगणात भाजपला पहिलं यश मिळालं आहे. गोशामहल मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार टी राजासिंग विजयी झाले आहेत. राजासिंग यांना 55,023 मतं मिळाली आहेत. तर तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रतिस्पर्धी उमेदवार प्रेम सिंग राठोड यांना 39,968 मतं घेण्यात यश आलं आहे. त्यामुळे जवळपास 10 हजार मतांनी विजय मिळवत राजासिंग यांनी आपली आमदारकी कायम राखली आहे. या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार एम. मुकेश गौड यांनी 24622 मतं घेतली आहेत. 

तेलंगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचार सभा घेतल्या. विशेष म्हणजे या सभांना मोठी गर्दीही होती. मात्र, या गर्दीचे मतांमध्ये परिवर्तन झाले नसल्याचे निकालावरुन स्पष्ट होत आहे. हैदराबादमधील जवळपास 15 महत्त्वाच्या मतदारसंघांपैकी भाजपला केवळ गोशामहल मतदारसंघात विजय मिळाला आहे. तर तेलंगणा राज्यातील भाजप प्रदेशाध्यक्ष डा.के.लक्ष्मण, भाजपा आमदार गटनेते जी. किशन रेड्डींसह इतरही दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

तेलंगणात विधानसभेच्या 119 जागांसाठी निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर भाजपनेही जोरदारी तयारी केली होती. हैदराबादच्या 15 विधानसभा मतदारसंघांपैकी 'ओल्ड सिटी'तील घोशामहल मतदारसंघात भाजपाने पुन्हा एकदा हिंदुत्ववादी चेहरा समोर केला आहे. हिंदुत्ववादी आणि मराठी मतांचा विचार करत भाजपाने हैदराबादच्या प्रतिष्ठित घोशामहल विधानसभा मतदारसंघातून टायगर राजासिंग यांना उमेदवारी दिली होती. कट्टर हिंदू समर्थक आणि कट्टर औवेसी विरोधक अशी त्यांची येथे ओळख आहे. राजासिंग यांचा प्रभाव लक्षात घेऊनच भाजपाने त्यांना रिंगणात उतरवले होते. भाजपाला तेलंगणात केवळ राजासिंग याच्या रुपाने एक जागेवर विजय मिळाला आहे. शहरातील मध्यवर्ती भागात हा मतदारसंघ असून येथे टी राजा यांचा मोठा प्रभाव आहे. हैदराबादमध्ये औवेसी बंधूंना टक्कर देणारा हिंदू नेता म्हणून टायगर राजा यांची राजधानी हैदराबादसह तेलंगणात ओळख आहे.  

राजासिंग यांनी विजयानंतर गोशामहल मतदारसंघातील मतदारांचे आभार मानले आहेत. गोशमहलमधील सर्व हिंदू कुटुंबीयांचे मनापासून आभार. आपण पुन्हा एकदा मला आपली सेवा, धर्माची सेवा आणि हिंदू समाजाची सेवा करण्याची संधी दिली, जय श्रीराम- जय गोमाता, असे राजासिंग यांनी म्हटले आहे.  

Web Title: T. Raj Singh won from goshamahal constituency in telangana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.