सुरेश प्रभूंनी रेल्वे अपघाताची जबाबदारी स्वीकारली! पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सादर केला राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 02:56 PM2017-08-23T14:56:29+5:302017-08-23T18:20:22+5:30

आठवडयाभरात झालेल्या दोन रेल्वे अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारुन  केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आपला राजीनामा सादर केला आहे.

Suresh Prabhu accepts responsibility for a Railway Accident! Resigns submitted to Prime Minister Narendra Modi | सुरेश प्रभूंनी रेल्वे अपघाताची जबाबदारी स्वीकारली! पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सादर केला राजीनामा

सुरेश प्रभूंनी रेल्वे अपघाताची जबाबदारी स्वीकारली! पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सादर केला राजीनामा

Next
ठळक मुद्दे पंतप्रधान मोदींनी त्यांचा राजीनामा तात्काळ स्वीकारलेला नसून त्यांना थांबण्यास सांगितले आहे.  कैफीतयत एक्सप्रेस घसरुन झालेल्या अपघातात 70 प्रवासी जखमी झाले

नवी दिल्ली, दि. 23 - आठवडयाभरात झालेल्या दोन रेल्वे अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारुन  केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आपला राजीनामा सादर केला आहे. सुरेश प्रभूंनी नरेंद्र मोदींना भेटून राजीनामा सादर केला. पंतप्रधान मोदींनी त्यांचा राजीनामा तात्काळ स्वीकारलेला नसून त्यांना थांबण्यास सांगितले आहे.  दोन रेल्वे अपघातांमध्ये प्रवाशांचे प्राण गेले, अनेक प्रवासी जखमी झाले. त्यामुळे मला प्रचंड  दु:ख, वेदना झाल्या असे प्रभूंनी  टि्वटमध्ये म्हटले आहे.  मात्र, पंतप्रधानांनी प्रभूंचा राजीनामा स्वीकारला नसल्यामुळे आणि वाट बघण्यास सांगितले असल्यामुळे ते काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.



कैफीतयत एक्सप्रेस घसरुन झालेल्या अपघातात 70 प्रवासी जखमी झाले तर, शनिवारी झालेल्या उत्कल एक्सप्रेसच्या अपघातात 22 प्रवाशांचा मृत्यू झाला. रेल्वेमंत्री म्हणून तीनवर्षांच्या कार्यकाळात आपण प्रचंड परिश्रम घेतले आहेत असे प्रभूंनी टि्वटमध्ये म्हटले आहे. 


न्यू इंडियाची जी कल्पना आहे त्यामध्ये रेल्वे प्रभावी आणि अत्याधुनिक असावी  असे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मत आहे. त्यादिशेने रेल्वेचा प्रवास सुरु आहे असे प्रभूंनी सांगितले. 



प्रभूंच्या आधी भारताचे दिवंगत पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांनी  रेल्वेमंत्री असताना तामिळनाडूतील रेल्वे अपघाताची जबाबदारी स्वीकारुन राजीनामा दिला होता. पण पंडित जवाहरलाल नेहरु यांनी त्यांचा राजीनामा फेटाळून लावला होता. तसेच आताचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही देशाचे रेल्वेमंत्रीपद संभाळले आहे. त्यांनी सुद्धा अशाच प्रकारे रेल्वे अपघाताची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. 

उत्तर प्रदेशातील आझमगडहून दिल्लीला रवाना झालेल्या कैफियत एक्स्प्रेसचा रात्री उशिरा अपघात झाला होता. एक्स्प्रेसचे दहा डबे रुळावरुन घसरले. 
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील कानपूर आणि इटावा दरम्यान औरैया जिल्ह्यात 12225 (अप) कैफियत एक्स्प्रेसचा अपघात झाला. येथील अछल्दा आणि पाता रेल्वे स्टेशनच्या दरम्यान मानवरहीत क्रॉसिंगजवळ रेल्वे फाटक आहे. या ठिकाणी फाटक क्रॉस करणा-या डंपरला कैफियत एक्स्प्रेसने धडक दिली. यावेळी कैफियत एक्स्प्रेसचे इंजिनसह दहा डबे रुळावरुन खाली घसरले. ही घटना रात्री अडीच वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, या अपघातात त्यात ७४ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना औरैया येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याचबरोबर, गेल्या शनिवारी उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात खतौली येथे पुरी-हरिद्वार उत्कल एक्स्प्रेसचे 14 डबे रुळावरून घसरून अपघात झाल्याची घटना घडली होती. या अपघातात 23 प्रवाशांचा मृत्यू झाला तर, 40 हून अधिक जखमी झाले आहेत. दरम्यान, हा अपघात अभियांत्रिकी विभागाच्या चुकीमुळे झाल्याचा प्रथमदर्शनी निष्कर्ष उत्तर रेल्वे प्रशासनाने काढला असून, याप्रकरणी वरिष्ठ विभागीय अभियंत्यासह अभियांत्रिकी विभागातील चौघांना निलंबित करण्यात आले आहे. तर उत्तर रेल्वेच्या व्यवस्थापकांसह 8 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तीन जणांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे, तर एका अधिका-याची बदली करण्यात आली आहे. 

Web Title: Suresh Prabhu accepts responsibility for a Railway Accident! Resigns submitted to Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.