राफेल सौद्यावरून मोदींविरोधात सोनिया गांधी उतरल्या मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 03:56 AM2018-08-11T03:56:56+5:302018-08-11T03:57:18+5:30

विरोधी ऐक्यासाठी सोनिया गांधी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, या राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या विधानानंतर शुक्रवारी खरोखरच श्रीमती गांधी मैदानात उतरलेल्या दिसल्या.

Sonia Gandhi landed against Modi on Rafael deal | राफेल सौद्यावरून मोदींविरोधात सोनिया गांधी उतरल्या मैदानात

राफेल सौद्यावरून मोदींविरोधात सोनिया गांधी उतरल्या मैदानात

googlenewsNext

- शीलेश शर्मा 
नवी दिल्ली : विरोधी ऐक्यासाठी सोनिया गांधी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, या राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या विधानानंतर शुक्रवारी खरोखरच श्रीमती गांधी मैदानात उतरलेल्या दिसल्या. राफेल विमान खरेदी व्यवहारातील कथित भ्रष्टाचाराच्या प्रश्नावर संसदेच्या प्रांगणात झालेल्या निदर्शनांचे नेतृत्व त्यांनी केले. काँग्रेस, राष्ट्रवादी, राजद, डावे यांच्यासह अनेक पक्षांचे संसद सदस्य यात सहभागी झाले
होते.
या खासदारांच्या हातात पंतप्रधान मोदी यांच्याविरोधी घोषणांची पोस्टर्स होती. राफेल सौद्याची माहिती जाहीर करा, अशी मागणी ते करीत होते. संसदेच्या दोन्ही सभागृहांतही विरोधकांनी हा विषय उपस्थित केला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त चिकित्सा समिती स्थापण्यात यावी, अशी मागणी लोकसभेत मल्लिकार्जुन खरगे यांनी, तर राज्यसभेत गुलाम नबी आझाद यांनी केला. आतापर्यंत हा सर्वांत मोठा घोटाळा आहे, असे आझाद म्हणाले. आनंद शर्मा यांनीही या विषयावरून सरकारवर टीकास्त्र सोडले.
राफेलसाठी फ्रान्सशी जो करार करण्यात आला, त्याची सत्यता सरकार दडवू पाहत आहे, असे विरोधकांचे म्हणणे आहे. काँग्रेस सरकारने ही विमाने ५२६ कोटी रुपयांत खरेदी करण्याचा करार केला होता. पण मोदी सरकारने त्यात बदल केला आणि विमानाची किंमत १६00 कोटी रुपये झाली. त्यामुळे यात ४५ हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. त्यामुळे संसदीय समितीमार्फतच या व्यवहाराची चौकशी व्हायला हवी.
>हक्कभंग प्रस्ताव बारगळणार?
हा विषय लोकसभेत उपस्थित झाला, तेव्हा भाजपाचे अनुराग ठाकूर यांनी आपण राहुल गांधी यांच्याविरोधात दिलेल्या हक्कभंग प्रस्तावाचे काय झाले, असा सवाल केला. मात्र लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याविरुद्ध काँग्रेसनेही हक्कभंग प्रस्ताव दिला असून, सीतारामन यांनी या व्यवहाराबाबत चुकीची माहिती दिल्याचा आरोप काँग्रेसने त्यात केला आहे. संसदेच्या प्रांगणात शुक्रवारी निदर्शने करताना काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्यासह अंबिका सोनी, ए. के. अँटोनी आणि हुसेन दलवाई आदी अनेक नेतेही सामील झाले.
>संसदेच्या अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस असल्याने विरोधकांनी सरकारवर तुटून पडण्याची ही संधी सोडली नाही.

Web Title: Sonia Gandhi landed against Modi on Rafael deal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.