UPSCत अव्वल आलेला मुलगा गर्लफ्रेंडचेही जाहीर आभार मानतो तेव्हा... 

By कुणाल गवाणकर | Published: April 7, 2019 03:39 PM2019-04-07T15:39:00+5:302019-04-07T15:47:11+5:30

कनिष्कने दाखवलेलं धाडस तरुणांना प्रचंड आवडलंय. यूपीएससी पास झालेला हा मुलगा यंग जनरेशनला भावलाय.

social media Cheers as UPSC Topper Kanishak Kataria Thanks Girlfriend Family for his Success | UPSCत अव्वल आलेला मुलगा गर्लफ्रेंडचेही जाहीर आभार मानतो तेव्हा... 

UPSCत अव्वल आलेला मुलगा गर्लफ्रेंडचेही जाहीर आभार मानतो तेव्हा... 

googlenewsNext

- कुणाल गवाणकर

निकाल पाहून मी चकित झालो... मी माझ्या पालकांचे, बहिणीचे आणि गर्लफ्रेंडचे आभार मानतो... यूपीएससी परिक्षेत अव्वल आलेल्या कनिष्क कटारियाची ही प्रतिक्रिया... तशी ही प्रतिक्रिया सामान्य आहे... पण एका शब्दामुळे, किंबहुना एका व्यक्तीमुळे कनिष्कचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुक सुरू आहे… सामान्य प्रतिक्रियेला असामान्य करणारा तो शब्द, ती व्यक्ती म्हणजे गर्लफ्रेंड… 

प्रेम म्हणजे लफडं, त्यामुळेच ती लपूनछपून करण्याची गोष्ट, प्रेम म्हणजे करिअरमधला अडसर... आपल्या समाजातील एका गटाचं प्रेमाबद्दलचं हे ठाम मत. या मंडळींना, यूपीएससीसारखी कठीण परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेला मुलगा जाहीरपणे गर्लफ्रेंडचे आभार मानतोय, हे पचनी पडणं जरा अवघडच. पण म्हणूनच, कनिष्कने दाखवलेलं हे धाडस तरुणांना प्रचंड आवडलंय. गड्या जिंकलंस यासारख्या प्रतिक्रिया अगदी उत्स्फूर्तपणे तरुणाईकडून व्यक्त होताहेत. यूपीएससी पास झालेला हा मुलगा यंग जनरेशनला भावलाय.

प्रेम म्हणजे नको ते उपद्व्याप.. करिअर आणि आयुष्य बरबाद करण्याचे धंदे.. या आणि अशा अनेक कमेंट्स आपण ऐकल्या आहेत. पण यूपीएससीसारखी आव्हानात्मक परीक्षा देताना, जिथं तुमचा प्रचंड कस लागतो, तिथे कोणाची तरी खंबीर साथ असणं खूप मोठी ऊर्जा देऊन जातं. आयुष्याच्या अशा एका वळणावर, जेव्हा तुम्ही परिस्थितीपुढे गुडघे टेकण्याची शक्यता सर्वाधिक असते, तिथे कोणीतरी सतत तुम्हाला उमेद दिली, तुमच्या क्षमतेची जाणीव करून दिली, तर मोठा आधार वाटतो. कनिष्कला त्याच्या गर्लफ्रेंडकडून तो आधार मिळाला. त्यामुळेच त्याने तिचे आभार मानले आणि तेही अगदी जाहीरपणे.

प्रेम म्हणजे वेळ फुकट घालवणं, फिरणं, आयुष्याची माती करणं, असे खोचक टोमणेही आपण ऐकलेत. कनिष्कने गर्लफ्रेंडचे आभार मानल्यावर अनेकांनी त्यावर ज्या प्रतिक्रिया दिल्या, त्यात याच माती कमेंटच्या तरुण-तरुणींच्या आठवणी वाचायला मिळाल्या. आमचे आई बाबा तर म्हणतात, प्रेम म्हणजे आयुष्याची वाट आणि हा यूपीएससी पास मुलगा तर गर्लफ्रेंडचे आभार मानतोय. आमचे पालक तर हजारदा सांगतात, प्रेमाची भानगड म्हणजे आयुष्याचं वाटोळं. कनिष्कने गर्लफ्रेंडचे आभार मानले त्यावर आलेल्या सोशल मीडियावरच्या या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया. या प्रतिक्रिया आपला प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दाखवायला पुरेशा आहेत.

एखादी व्यक्ती अडचणीत, आव्हानात्मक स्थितीत आपल्याला साथ देते. कठीण परिस्थितीत पाय रोवून आपल्या बाजूने उभी राहते. आपला स्वतःवरच विश्वास डळमळीत होतो, तेव्हा सावरते. अशी व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात हवी. तुमच्या कठीण प्रसंगात एखादी व्यक्ती खंबीरपणे तुमच्या सोबत असते, यापेक्षा उत्तम आयुष्यात काहीच असू शकत नाही. अशा व्यक्तीचा फक्त सहवासदेखील बळ देऊन जातो. परिस्थितीशी दोन हात करण्याची ताकद देतो. कनिष्कला यूपीएससीसारख्या अवघड परीक्षेची तयारी करताना अशा व्यक्तीची साथ लाभली.. त्यामुळे त्याला लकीच म्हणायला हवं. 

पण इथे जास्त कौतुक वाटतं ते कनिष्कच्या कुटुंबाचं. जिथे सर्वसामान्य तरुण, तरुणी आपल्या गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंडचा नंबर भलत्याच नावाने सेव्ह करतात, घरी पोहोचताच तिला किंवा त्याला मेसेज करून आता चुकूनही कॉल करू नको असं सांगतात, खोटं बोलून लपूनछपून भेटायला जातात, घरच्यांमुळे हे सर्व करावं लागतं. पण कनिष्कचं कुटुंब, त्या कुटुंबातलं वातावरण पूर्णपणे वेगळं. त्यामुळेच तर हा भिडू कुटुंबासमोर माध्यमांना प्रतिक्रिया देताना अगदी बिनधास्तपणे गर्लफ्रेंडचे आभार मानून मोकळा होतो. आजच्या मुलांना अशाच वातावरणाची गरज आहे. त्यांचं जग समजून घेण्याची आवश्यकता आहे. तसं घडलं तर आई बाबांसोबत खोटं बोलण्याची गरज भासणार नाही. 

पण या परिस्थितीत मुलांची जबाबदारी देखील वाढते.. आई बाबा सूट देतात म्हणून वाट्टेल ते केलं तरी चालेल, अशी वृत्ती तयार व्हायला नको. स्वातंत्र्याचं रूपांतर स्वैराचारात व्हायला नको.. त्यामुळेच कनिष्कने दिलेली ती प्रतिक्रिया मोलाची आहे. गर्लफ्रेंडमुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं, करिअर आणि आयुष्य उद्ध्वस्त होतं, हा समाजाचा समज मोडण्याच्या दृष्टीने कनिष्कने एक पाऊल टाकलंय असं म्हणता येईल. अशा मुलांची आणि पालकांची आज गरज आहे. सध्याची जीवघेणी स्पर्धा पाहता मुलं आणि पालकांमध्ये असं पारदर्शक, सुसंवाद असलेलं नातं तयार होणं अतिशय आवश्यक वाटतं.

Web Title: social media Cheers as UPSC Topper Kanishak Kataria Thanks Girlfriend Family for his Success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.