कन्हैय्याची लीला अपार; वरिष्ठांना डावलून कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकारिणीत स्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:52 PM2018-04-30T12:52:35+5:302018-04-30T12:52:35+5:30

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या 125 सदस्यांच्या नावांचीही यावेळी घोषणा करण्यात आली.

Senior leaders out CPI brings in JNU Kanhaiya Kumar | कन्हैय्याची लीला अपार; वरिष्ठांना डावलून कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकारिणीत स्थान

कन्हैय्याची लीला अपार; वरिष्ठांना डावलून कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकारिणीत स्थान

googlenewsNext

तिरुवनंतपूरम: जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) आंदोलनानंतर प्रकाशझोतात आलेला विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याला कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या (सीपीआय) राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना डावलून कन्हैया कुमारला ही संधी देण्यात आली आहे. त्यामुळे सीपीआयमधील एका गटात नाराजी पसरली आहे. 

कोल्लाम येथे झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात एस. सुधाकर रेड्डी यांची सलग तिसऱ्यांदा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. याशिवाय, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या 125 सदस्यांच्या नावांचीही यावेळी घोषणा करण्यात आली. यामध्ये कन्हैया कुमारला स्थान देण्यात आले आहे. परंतु, सी. दिवाकरन, सथ्यन मोकरी, सी.एन. चंद्रन व कमला सदानंदन या वरिष्ठ नेत्यांना कार्यकारिणीत स्थान मिळालेले नाही. यावरून हे नेते नाराज असल्याचे समजते. याविषयी बोलताना सी. दिवाकरन यांनी म्हटले की, पक्षात माझा कोणीही गॉडफादर नाही. मलादेखील कोणाच्या पाठिंब्यावर राष्ट्रीय कार्यकारिणीत टिकून राहण्यात कोणताही रस नसल्याचे त्यांनी म्हटले. तर पक्षाचे सचिव कनम राजेंद्रन यांनी दिवाकरन आणि अन्य नेत्यांच्या गच्छंतीचे समर्थन केले आहे. पक्षाची नवी कार्यकारिणी एकमताने निवडण्यात आली आहे. पक्षाच्या घटनेनुसार कार्यकारिणीत 20 टक्के नवे चेहरे असणे अपेक्षित आहे. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे राजेंद्रन यांनी सांगितले. 

यावेळी पक्षाचे सरचिटणीस एस. सुधाकर रेड्डी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मोदी सरकार जनतेची लूट करणारी आर्थिक धोरणे राबवत आहे. या सरकारच्या काळात देशातील लोकशाही व निधर्मी मुल्यांचा ऱ्हास झाल्याचे रेड्डी यांनी सांगितले. 
 

Web Title: Senior leaders out CPI brings in JNU Kanhaiya Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.