ठळक मुद्देबहुजन समाज पक्षाच्या निळ्या आणि समाजवादी पक्षाच्या लाल हिरव्या रंगानंतर उत्तर प्रदेशला आता नवा रंगबुधवारी योगी आदित्यनाथ यांनी राज्य रस्ते परिवहन मंडळाच्या 50 बसचं उद्घाटन केलंविशेष म्हणजे या सर्व बसेसनाही भगवा रंग देण्यात आला

लखनऊ - बहुजन समाज पक्षाच्या निळ्या आणि समाजवादी पक्षाच्या लाल हिरव्या रंगानंतर उत्तर प्रदेशला आता नवा रंग मिळाला आहे, तो म्हणजे भगवा. सुरुवात झाली ती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापासून. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारी निवासस्थानी असलेल्या कार्यालयामधील खुर्चीवर आणि गाडीच्या सीटवर भगवा टॉवेल ठेवण्यापासून सुरु झालेला हा रंगाचा खेळ आता सरकारी बुकलेट्स, स्कूल बॅग आणि आता बसपर्यंत पोहोचला आहे. 

बुधवारी योगी आदित्यनाथ यांनी राज्य रस्ते परिवहन मंडळाच्या 50 बसचं उद्घाटन केलं. 'संकल्प सेवा' योजनेअंतर्गत उद्घाटन करण्यात आलेल्या या सर्व बसेस ग्रामीण भागात धावणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व बसेसनाही भगवा रंग देण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सजवण्यात आलेल्या स्टेजवरही भगव्या रंगाचे पडदे लावण्यात आले होते. सोबतच उद्धाटनासाठी उभ्या करण्यात आलेल्या बसवरही भगव्या रंगाचे फुगे लावण्यात आले होते. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कानपूर वर्कशॉपमध्ये या सर्व बसेसना भगवा रंग देण्याचं काम करण्यात आलं. याशिवाय अजूनही काही बसेस लवकरच ताफ्यात दाखल होणार आहेत. 

याआधी प्राथमिक शिक्षण विभागाने माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा फोटो असणारी स्कूल बॅग बदली करत त्याठिकाणी भगव्या रंगाची स्कूल बॅग आणली. लवकरच या स्कूल बॅग सरकारी प्राथमिक शाळांमध्ये वाटल्या जाणार आहेत. 

29 ऑगस्ट रोजी योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते राज्यातील खेळाडूंना 'लक्ष्मण आणि राणी लक्ष्मीबाई' पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. यावेळी देण्यात आलेल्या प्रमाणपत्रांना भगव्या रंगाचा बॅकग्राऊंड ठेवण्यात आला होता. याशिवाय खेळाडूंची माहिती देणारं बुकलेटही भगव्या रंगातच होतं. 

जून महिन्यात योगी आदित्यनाथ यांनी सरकारला 100 दिवस पुर्ण झाल्याच्या निमित्ताने बुकलेट रिलीज केलं होतं. त्याआधी सहा महिने पुर्ण झाल्यानंतरही बुकलेट प्रसिद्ध करण्यात आलं होतं. हे दोन्ही बुकलेट्स भगव्या रंगातच होते. माहिती विभागाची डायरी, ज्यामध्ये सर्व सरकारी अधिकारी आणि कार्यालयांचे संपर्क क्रमांक आहेत त्याचा बॅकग्राऊंडही भगवाच आहे. समाजवादी पक्षाचं सरकार असताना डायरी लाल रंगात होती, तर मायावती मुख्यमंत्री असताना निळा रंग होता. 

कॅबिनेट मंत्री श्रीकांत शर्मा यांना याबद्दल विचारलं असता, 'आम्हाला सर्व रंग आवडतात, पण भगवा आमचा आवडता रंग आहे. भगवा रंग त्याग, बलिदान आणि शौर्याची निशाणी आहे. आपल्या तिरंग्यातही भगवा रंग आहे. भगवा आमची वैयक्तिक निवड आहे, आणि कोणाचा त्यावर आक्षेप असण्याचं कारण नाही', असं त्यांनी सांगितलं.