काश्मिरी अतिरेकी संघटनांत पाकिस्तानचे निवृत्त सैनिक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 12:02 PM2023-11-25T12:02:16+5:302023-11-25T12:02:39+5:30

खात्मा केल्याने पाकच्या कटाला जबर धक्का : ले. जनरल द्विवेदी

Retired Pakistani soldiers in Kashmiri militant organizations | काश्मिरी अतिरेकी संघटनांत पाकिस्तानचे निवृत्त सैनिक

काश्मिरी अतिरेकी संघटनांत पाकिस्तानचे निवृत्त सैनिक

जम्मू : पाकिस्तान जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना घुसवण्याचा प्रयत्न करत आहे. दहशतवादी संघटनांमध्ये पाकिस्तानचे निवृत्त सैनिक आहेत, असे लष्कराच्या उत्तरी कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शुक्रवारी सांगितले.    

बुधवार आणि गुरुवारी राजौरी जिल्ह्यातील धरमसाल भागातील बाजीमल भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या दोन कॅप्टनसह पाच लष्करी जवानांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर द्विवेदी यांनी हे विधान केले. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलांनी अफगाणिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेला आणि पाकचा रहिवासी असलेला प्रमुख लष्कर कमांडर क्वारीसह दोन दहशतवाद्यांना ठार केले. लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी सांगितले की, दोन परदेशी दहशतवाद्यांचा खात्मा हा प्रदेश अस्थिर करण्याच्या पाकिस्तानच्या कटाला मोठा धक्का आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी कारवाई तीव्र करण्यात आली आहे.

पाकला स्थानिकांचा मिळेना पाठिंबा...
दहशतवाद्यांमध्ये काही पाकिस्तानी स्पेशल फोर्सच्या जवानांच्या उपस्थितीबद्दल विचारले असता, लेफ्टनंट जनरल म्हणाले की, आम्ही जेव्हा दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला कळले की त्यांच्यापैकी काही (पाकिस्तानी लष्कराचे) निवृत्त सैनिक आहेत. 
स्थानिक तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यास इच्छुक नसल्याने तसेच पाकिस्तानमधील स्थानिक नागरिकांचा, विशेषत: तरुणांचा पाठिंबा नसल्यामुळे पाकिस्तान परदेशी दहशतवाद्यांना पाठवण्याचा प्रयत्न करत आहे. 

शहीद मुलगा कॅप्टन शुभम गुप्ताच्या पार्थिवाला अभिवादन करताना वडिलांनी हंबरडा फोडला होता.

२०२३ मध्ये जम्मूत १४ जवान, २५ दहशतवाद्यांसह ४६ जण मारले गेले.

आणखी हल्ले होण्याची भीती
लोकसभा निवडणुकीसह आगामी निवडणुकांमध्ये अडथळा आणण्यासाठी येत्या काही महिन्यांत आणखी दहशतवादी पाठवण्याचा पाकचा हेतू आहे का, असे विचारले असता त्यांनी ‘हो’ असे उत्तर दिले.

लग्न १५ दिवसांनी होणार होते, पण...
अलिगडमधील शहीद सचिन लाऊर यांचे ८ डिसेंबरला लग्न होणार होते. कुटुंबीय त्यासाठी तयारी करत होते. ८ डिसेंबरला मथुरेत सचिन यांच्या लग्नाची मिरवणूक निघणार होती, पण काळाला हे मान्य नव्हते.

 

Web Title: Retired Pakistani soldiers in Kashmiri militant organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.