नाणारवासीयांच्या संघर्षाला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2018 08:38 PM2018-04-28T20:38:20+5:302018-04-28T22:07:24+5:30

नाणार प्रकल्पविरोधी समितीच्या शिष्टमंडळाने शनिवारी (28 एप्रिल) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची यांची भेट घेतली.

Rahul Gandhi's meeting with anti nanar refinery project Committee | नाणारवासीयांच्या संघर्षाला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा पाठिंबा

नाणारवासीयांच्या संघर्षाला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा पाठिंबा

नवी दिल्ली - रत्नागिरीतील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाविरोधात संघर्ष करणाऱ्या ग्रामस्थांना काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पाठिंबा दर्शवला आहे. ग्रामस्थांच्या प्रखर संघर्षाबद्दल सहानुभूती व्यक्त करत प्रकल्पाकरिता सुपीक व भरपूर उत्पन्न देणा-या जमिनी का घेतल्या जात आहेत? असा संतप्त सवाल त्यांनी सरकारला केला आहे.

शनिवारी (28 एप्रिल) नाणार रिफायनरीविरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत दिल्ली येथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आणि आपल्या गेल्या अनेक दिवसांच्या संघर्षाबद्दल काँग्रेस अध्यक्षांना अवगत केले. सायंकाळी ६ ते ६.३० वाजेपर्यंत चाललेल्या बैठकीत काँग्रेस अध्यक्षांनी या प्रकल्पाला होणा-या विरोधाची आणि कारणांची सखोल माहिती घेतली. प्रकल्प विरोधी कृती समितीचे अध्यक्ष अशोक वालम व इतर सदस्यांनी याबद्दलची पार्श्वभूमी स्पष्ट करताना सदर गावांत जवळपास आंबे, काजू, नारळ, सुपारी, साग, बांबू इत्यादींची सहा कोटी झाडे असून सभोवती पश्चिम घाटाचा भाग देखील येतो हे सांगितले तसेच या प्रकल्पामुळे ५० हजार लोक विस्थापित होणार असून मच्छिमारांसहीत बागायतदारांचे प्रचंड मोठे नुकसान होणार आहे.

त्याचबरोबर सदर प्रकल्प हा पर्यावरणासाठी घातक आहे असेही सांगितले. यासंदर्भात काँग्रेस अध्यक्षांनी सुपीक जमीन का घेतली जात आहे? असे म्हणत या प्रकल्पाला होणा-या विरोधाला पाठिंबा दर्शवला. शिवसेना व भाजपा हे दोन्ही पक्ष आम्हाला फसवत असून राज्य सरकार जनतेच्या भावनांशी खेळत आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले त्यावर राहुल गांधी यांनी तात्काळ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना सदर प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्याची सूचना केली त्यानुसार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण 2 मे रोजी नाणार येथे जाणार असून ते स्थानिकांशी संवाद साधणार आहेत.

ग्रामस्थांनी राहुल गांधी यांना कोकणात येण्याचे निमंत्रण दिले आणि  तुम्हीच ही लढाई लढू शकता असा विश्वास व्यक्त केला. यासंदर्भात राहुल गांधी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.  

Web Title: Rahul Gandhi's meeting with anti nanar refinery project Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.