काश्मीरमधील उचापतखोरांना फक्त बंदुकीची भाषा कळते- मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 10:49 AM2018-03-16T10:49:29+5:302018-03-16T10:49:29+5:30

Power and tact needed in Kashmir RSS chief Mohan Bhagwat | काश्मीरमधील उचापतखोरांना फक्त बंदुकीची भाषा कळते- मोहन भागवत

काश्मीरमधील उचापतखोरांना फक्त बंदुकीची भाषा कळते- मोहन भागवत

Next

काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींविरोधात सामर्थ्य आणि युक्ती या दोन्हींचा वापर केला पाहिजे. मात्र, त्याचवेळी काही उचापतखोरांना फक्त बंदुकीची आणि सामर्थ्याची भाषाच कळते, हेदेखील लक्षात ठेवावे असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडले. 

जम्मू-काश्मीर स्टडी सेंटरतर्फे नागपूरच्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात आयोजित सप्तसिंधू जम्मू-काश्मीर लद्दाख महोत्सवाचे उद्घाटन डॉ. भागवत यांच्या हस्ते झाले. यावेळी मोहन भागवत बोलत होते. त्यांनी म्हटले की, काश्मीरमध्ये सत्याचा विजय व्हायचा असेल तर शक्ती आणि युक्ती दोहोंचा वापर करणे गरजेचे आहे. भारतीय लष्कराच्या प्रयत्न, त्याग आणि निष्ठेमुळे काश्मीरमध्ये भारताचे सामर्थ्य अबाधित आहे. काही उचापतखोरांना सामर्थ्याचीच भाषा कळते, असे मोहन भागवत यांनी म्हटले. 


काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. किंबहुना भारतीय उपखंडातील सर्व लोकांचा डीएनए एकच आहे. काश्मीर प्रश्नाकडे एक समस्या म्हणून बघितले जाऊ नये. अनेकजण आमची भाषा वेगळी असल्यामुळे काश्मीर स्वतंत्र करावा, अशी मागणी करतात. आपल्याला भारताच्या अखंडतेचा विसर पडल्यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. जम्मू, काश्मीर, लडाख, गिलगीट, पाकिस्तान, सियाचीन एवढेच नव्हे तर पूर्व काबूल, म्यानमारमधील चिंद्वीन नदीचा काबुलपर्यंतचा पश्चिम भाग, चीनकडील बाजूस असणारा तिबेटचा उताराचा प्रदेश आणि श्रीलंकेचा दक्षिण भाग हा सर्व अखंड भारताचा परिसर असल्याचे भागवत यांनी सांगितले. 
जम्मू-काश्मीरमधील युवकांचे मतपरिवर्तन करून त्यांना सरकारविरोधात भडकावले जात आहे. सैनिकांसह, सरकारी बसवर दगडफेक केली जात आहे. काश्मीरमध्ये जे काही आहे, ते सरकारचे आहे. त्यामुळे दगडफेकीतून होणारे नुकसान हे आपलेच नुकसान आहे हे सर्वाना पटवून सांगण्याची गरज आहे. सरकारची मदत शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्याचा योग्य वापर होणे गरजेचे आहे, असेही भागवत यांनी सांगितले.

Web Title: Power and tact needed in Kashmir RSS chief Mohan Bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.