PM Narendra Modi friend run away with MGNREGA one year money says Rahul Gandhi | मोदींचा मित्र मनरेगाचा एका वर्षाचा पैसा घेऊन पळाला- राहुल गांधी
मोदींचा मित्र मनरेगाचा एका वर्षाचा पैसा घेऊन पळाला- राहुल गांधी

चंद्रपूर: नीरव मोदी व मेहुल चोक्सी हे दोघे नरेंद्र मोदींचे चांगले मित्र आहेत. हे दोघेही मनरेगा योजनेचा एका वर्षाचा पैसा घेऊन पळाल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. ते बुधवारी चंद्रपूर येथील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मोदी सरकार गरिबांच्या खिशातून पैसे काढून श्रीमंतांना देत आहे. पंतप्रधान मोदींनी नीरव मोदीला 35 हजार कोटी दिले. हेच 5 कोटी दादाजी खोब्रागडे यांच्यासारख्या संशोधकांना दिले असते तर मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती झाली असती, असे राहुल यांनी म्हटले.

जर सरकार उद्योगपतींना मदत करेल असेल तर, त्यांनी शेतकऱ्यांनादेखील मदत करायला हवी. शेतकऱ्यांचे रक्षण होऊ शकेल, इतका पैसा सरकारकडे नक्कीच आहे. केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास आम्ही तो पैसा नक्कीच शेतकऱ्यांच्या खिशात टाकू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले.

तत्पूर्वी राहुल गांधी यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेतही मोदी सरकार फक्त श्रीमंतांच्या भल्यासाठी काम करत असल्याची टीका केली. केंद्रातील मोदी सरकार केवळ श्रीमंतांसाठी काम करतेय. गरीबांच्या खिशातील पैसा श्रीमतांच्या खिशात ओतला जात आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. पुढे ते असंही म्हणालेत की, मनमोहन सिंग सरकारच्या काळात पेट्रोलचे दर 140 डॉलर प्रति बॅरल होते. आज तेच दर 70 डॉलर प्रति बॅरल आहेत. म्हणजेच दर कोसळूनही जनतेला त्याचा फायदा होत नाही. हा पैसा कुठे जातोय?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणा, अशी मागणीही राहुल यांनी केली.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.