इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 09:30 IST2018-09-04T08:20:05+5:302018-09-04T09:30:38+5:30
पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस अधिकच वाढ होत असून मुंबईत पेट्रोलच्या दराने उच्चांक गाठला आहे.

इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं
नवी दिल्ली - पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस अधिकच वाढ होत असून मुंबईतपेट्रोलच्या दराने उच्चांक गाठला आहे. मुंबईत मंगळवारी (4 सप्टेंबर) पेट्रोल 16 पैसे प्रति लिटर आणि डिझेल 20 पैसे प्रति लिटर महाग झाले आहे. यामुळे मुंबईत आजचा पेट्रोलचा प्रतिलिटर दर 86.72 तर डिझेलचा प्रतिलिटर दर 75.74 झाला आहे. याआधी मुंबईत सोमवारी पेट्रोलचा सर्वाधिक दर म्हणजेच प्रतिलिटर 86.56 इतका होता. ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना भीषण महागाईचा सामना करावा लागणार आहे. धान्ये, खाद्यान्न, भाजीपाला, प्रवास सारेच महागल्याने सर्वसामान्यांचे अर्थकारण कोलमडण्याची भीती आहे.
(सौजन्यः पेट्रोल-डिझेल प्राइज डॉट कॉम)
राजधानी दिल्लीत पेट्रोल 16 पैसे तर डिझेल 19 पैशांनी प्रतिलिटरमागे महाग झाले आहे. यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोलसाठी एक लिटरमागे 79.31 रुपये तर डिझेलसाठी प्रतिलिटर 71.34 रुपये नागरिकांना मोजावे लागत आहे.
#Delhi: Petrol price in the city, today, is Rs 79.31/litre and price of diesel is Rs 71.34/litre. Visuals from a petrol pump in the city. pic.twitter.com/WuKhRjzzGx
— ANI (@ANI) September 4, 2018
पेट्रोल-डिझेल दरवाढीने बिघडले सामान्यांचे बजेट; बसभाडेही महागणार
महाराष्ट्रात सर्वात जास्त महाग पेट्रोल हे अमरावतीत मिळत आहे. अमरावतीत सोमवारी (3 सप्टेंबर) रोजी पेट्रोलचा प्रतिलिटर दर 87.97 तर डिझेलचा प्रतिलिटर दर 77.09 होता. त्यानंतर आज त्यामध्ये वाढ होऊन पेट्रोलचा प्रतिलिटर दर 88.14 तर डिझेलचा प्रतिलिटर दर 77.29 झाला आहे.
सलग 10 दिवस पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरू आहे. खाद्यान्न, धान्य, भाजीपाला यांची वाहतूक डिझेलच्या वाहनाने होत असते. ही वाहतूक करणाऱ्या मालवाहतूकदारांनी डिझेल 68 रुपये प्रति लीटरवर असताना मालभाड्याचा दर निश्चित केला होता. डिझेल 74 रुपये होईपर्यंत आम्ही सहन करू, पण त्यानंतर भाडेदरात वाढीचा विचार करावा लागेल, असे मालवाहतूकदारांनी ‘लोकमत’ला सांगितले होते.