'त्या' नंबरमुळे मोबाईलमधील माहितीची चोरी अशक्य; आधारचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 07:26 AM2018-08-06T07:26:15+5:302018-08-06T07:35:13+5:30

आधारबद्दलच्या सर्व अफवा निराधार असल्याचं यूआयडीएआयनं म्हटलं आहे

people with vested interest trying to create fear against aadhar after googles mistake says uidai | 'त्या' नंबरमुळे मोबाईलमधील माहितीची चोरी अशक्य; आधारचं स्पष्टीकरण

'त्या' नंबरमुळे मोबाईलमधील माहितीची चोरी अशक्य; आधारचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली : हजारो मोबाईलमध्ये आपोआप आधार हेल्पलाईन नंबर सेव्ह झाल्यामुळे खळबळ उडाल्यानंतर युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरटी ऑफ इंडियानं स्पष्टीकरण दिलं आहे. या प्रकरणाचा हॅकिंग किंवा डेटा चोरीशी काहीही संबंध नाही, असं आधारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. 

'गुगलकडून चूक झाल्यानं आधारचा हेल्पलाईन नंबर अनेकांच्या मोबाईलमध्ये सेव्ह झाला. त्याचा गैरफायदा काही स्वार्थी हेतू असलेल्या व्यक्ती घेत आहेत. आधारबद्दल लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा काहींचा प्रयत्न आहे. आधारविरोधात वातावरण निर्माण करु पाहणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो,' असं यूआयडीएआयनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 'गुगलकडून झालेल्या एका चुकीमुळे आधार हेल्पलाईन नंबर अनेकांच्या मोबाईलमध्ये आपोआप सेव्ह झाला. त्यावरुन अनेकजण आधारविरोधात लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हेल्पलाईन नंबरच्या मदतीनं मोबाईलमधील माहिती चोरली जाऊ शकत नाही. ट्विटर आणि व्हॉट्स अॅपवर सध्या याबद्दल अनेक अफवा पसरवल्या जात आहेत', असं यूआयडीएआयनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.






'मोबाईलमध्ये सेव्ह झालेल्या आधार हेल्पलाईन नंबरमुळे आधार कार्डवरील माहिती चोरीला जाऊ शकते. त्यामुळे हा हेल्पलाईन नंबर तातडीनं डिलीट करा, असे मेसेज व्हायरल होत आहेत. मात्र या नंबरमुळे माहितीची चोरी होऊ शकत नाही. त्यामुळे हा नंबर डिलीट करण्याची आवश्यकता नाही,' असं यूआयडीएआयनं ट्विटमधून स्पष्ट केलं आहे. सोशल मीडियावर काहीजण आधारकडून झालेल्या चुकीचा वापर स्वत:च्या स्वार्थासाठी करत असल्याचा आरोपदेखील यूआयडीएआयनं केला आहे. आधारविरोधात गैरसमज निर्माण करण्याचा, लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न काही जणांकडून सुरू आहे. मात्र मोबाईलमध्ये सेव्ह झालेला तो क्रमांक फक्त आधारचा हेल्पलाईन नंबर आहे. तो नंबर आता आऊटडेटेडदेखील झालेला आहे. त्यामुळे यातून कोणतंही नुकसान होणार नाही. मोबाईलच्या कॉन्टॅक लिस्टमध्ये एखादा नंबर असल्यानं माहितीची चोरी होत नाही, असंही यूआयडीएआयनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 



 



 

Web Title: people with vested interest trying to create fear against aadhar after googles mistake says uidai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.