जनता कुणाचीही मग्रुरी सहन करत नाही, निकालानंतर शरद पवारांचा मोदींना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 15:56 IST2018-12-11T15:55:30+5:302018-12-11T15:56:24+5:30
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. त्यासाठी राज्यसभा खासदार शरद पवार संसदेत आले होते.

जनता कुणाचीही मग्रुरी सहन करत नाही, निकालानंतर शरद पवारांचा मोदींना टोला
नवी दिल्ली - देशातील पाच राज्यांमध्ये भाजपाल सपाटून मार खावा लागला आहे. त्यामुळे भाजपावर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहेत. पाचपैकी मध्य प्रदेश वगळता इतर राज्यांत भाजापचा पराभव झाल्याचे दिसून येत आहे. तर मध्य प्रदेशात काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. त्यातच, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या निकालानंतर भाजपला टोला लगावला.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. त्यासाठी राज्यसभा खासदार शरद पवार संसदेत आले होते. त्यावेळी, देशातील पाच राज्यांच्या निवडणूक निकालाबाबत पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना, जनता कोणाचीही मग्रुरी सहन करत नाही, हेच या निकालावरुन स्पष्ट होत आहे, असे पवार यांनी म्हटले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरम या राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे. या पाचपैकी एकाही राज्यात भाजपाला सत्ता मिळविण्यात यश आले नाही. तर, राजस्थानमध्ये सत्ता राखण्यातही भाजप अपयशी ठरल्याचे दिसून येते. तर मध्य प्रदेशमध्येही अटीतटीचा सामना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे तेलंगणात तेलुगू जनतेनं भाजपाला स्पष्टपणे नाकारलं आहे. तेलंगणात भाजपला अद्याप 2 जागांवर आघाडी असून संपर्ण निकालानंतरच चित्र स्पष्ट होणार आह. तर मिझोरमध्ये एमएनएफ पक्षाला सर्वात मोठी आघाडी मिळाल्याचे दिसून येते. या निकालाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी भाजपच्या मग्रुरीचा हा परिणाम असल्याचं म्हटलंय. जनता कुणाचीही मग्रुरी सहन करत नसल्याचं पवार यांनी म्हणत मोदींना टोला लगावला.