Pema Khandu is accused of rape | पेमा खांडू यांच्यावर बलात्काराचा आरोप
पेमा खांडू यांच्यावर बलात्काराचा आरोप

नवी दिल्ली: अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी काही वर्षांपूर्वी आपल्यावर बलात्कार केला असा आरोप करणारी आणि याप्रकरणी स्थानिक न्यायालयांकडून नि:ष्पक्ष न्याय मिळण्याची शक्यता नसल्याने याविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याची परवानगी मागणारी एक याचिका अरुणाचलमधील एका महिलेने सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

पेमा खांडू व अन्य तिघांविरुद्ध यासंदर्भात तक्रार करूनही इटानगर पोलिसांनी गुन्हा न नोंदविल्याने व तेथील दंडाधिकाऱ्यांनीही तसा आदेश देण्यास नकार दिल्याने आपल्याला न्यायासाठी राज्याबाहेर दाद मागावी लागत आहे, असे या महिलेचे म्हणणे आहे.
घडलेल्या कथित घटनेचा तपशील देताना ही महिला याचिकेत म्हणते की, त्यावेळी मी १५ वर्षांची होते व इटानगरमधील एका ‘पीसीओ’मध्ये काम करत होते. त्यावेळी फुर्मा लामा नावाचा एक इसम सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने आपल्याला भेटला.
ही महिला म्हणते की, नंतर हा इसम मला काही लोकांना भेटण्यासाठी एका ठिकाणी घेऊन गेला. तेथे आणखी तीनजण होते. याचिकेत त्या इतर तिघांची नावे पेमा खांडू, सरकारी शाळेतील एक शिक्षक थुप्टेन ताशी व झिरो येथील सहाय्यक जिल्हा खनीकर्म अधिकारी दोरजे वांग्चुक अशी देण्यात आली आहेत. त्यावेळी मला जे थंडपेय देण्यात आले त्यात गुंगी आणणारे औषध मिसळलेले होते. थोड्या वेळाने मी बेशुद्ध झाल्यावर त्या चौघांनी माझ्यावर आळीपाळीने बलात्कार केला. शुद्ध आल्यावर झाला प्रकार लक्षात आला. पण तक्रार केल्यास गंभीर परिणाम होतील अशी धमकी लामा याने दिल्याने भीतीने त्यावेळी आपण तक्रार केली नाही.

ही महिला पुढे म्हणते की, त्यावेळी हे लोक नेमके कोण होते हे मला कळले नाही. परंतु सन २०१२ मध्ये पेमा खांडू अरुणाचलचे पर्यावरणमंत्री झाले व त्यांची छायाचित्रे वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली तेव्हा आपल्यावर अत्याचार करणाऱ्यांमध्ये खांडू हेही होते, याची आपल्याला खात्री पटली.


Web Title: Pema Khandu is accused of rape
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.