भाजपात येण्यासाठी 1 कोटी रुपयांची ऑफर, पाटीदार नेता नरेंद्र पटेल यांचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2017 07:49 AM2017-10-23T07:49:49+5:302017-10-23T08:59:57+5:30

पाटीदार समाजाचे नेते नरेंद्र पटेल यांनी दावा केला आहे की, भाजपामध्ये येण्यासाठी त्यांना तब्बल 1 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली.

patidar leader narendra patel allegation bjp offered 1 crore rupees to join party | भाजपात येण्यासाठी 1 कोटी रुपयांची ऑफर, पाटीदार नेता नरेंद्र पटेल यांचा खळबळजनक आरोप

भाजपात येण्यासाठी 1 कोटी रुपयांची ऑफर, पाटीदार नेता नरेंद्र पटेल यांचा खळबळजनक आरोप

googlenewsNext

नवी दिल्ली - भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी मला एक कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली, असा खळबळजनक आरोप पाटीदार समाजाचे नेते नरेंद्र पटेल यांनी केला आहे. ''यातील 10 लाख रुपयांची रक्कम पक्षप्रवेशासाठी सुरुवातीलाच देण्यात आली. उर्वरित 90 लाख रुपये सोमवारी (23 ऑक्टोबर) देण्यात येणार होते'', असा खळबळजनक आरोप नरेंद्र पटेल यांनी केला आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांना भाजपाला घरचा अहेर दिला आहे.

गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते असलेले वरुण पटेल यांनी भाजपा प्रवेशासाठी एक कोटी रुपये देण्याची ऑफर दिली, असा आरोपही नरेंद्र पटेल यांनी केला आहे. वरुण पटेल यांनी मात्र नरेंद्र पटेलांचे आरोप फेटाळले आहेत. शिवाय त्यांनी नरेंद्र पटेल यांना काँग्रेसचे एजंट म्हटले आहे. 

नरेंद्र पटेल यांनी मीडियाला सांगितले की, ''वरुण पटेल यांनी माझ्यासाठी भाजपासोबत एक कोटी रुपयांचं डील केले. यासाठी मला 10 लाख रुपये अॅडवान्स दिले. उर्वरित 90 लाख रुपये ते मला सोमवारी देणार होते. पण त्यांनी मला पूर्ण रिझर्व्ह बँक जरी देऊ केली तरीही ते मला विकत घेऊ शकत नाहीत''.  कथित स्वरुपात भाजपाकडून अॅडवान्स मिळालेली रक्कम त्यांनी पत्रकार परिषदेतही आणली. ''भाजपाकडून अॅडवान्स रक्कम यासाठी घेतली कारण सर्वांसमोर वरुण पटेल आणि भाजपाचा पर्दाफाश करता यावा'', असा दावाही नरेंद्र पटेल यांनी केला आहे.

दरम्यान, वरुण पटेल आणि रेशमा पटेल यांनी रविवारी सकाळी भाजपामध्ये प्रवेश केला. हे दोघंही पाटीदार आंदोलनातील नेते होते. भाजपाप्रवेश करताना दोघांनी असा आरोप केला की, हार्दिक पटेलनं काँग्रेससोबत हातमिळवणी केली आहे.

तर दुसरीकडे,  नरेंद्र पटेल काँग्रेसच्या सांगण्यावरुन आरोप करत असल्याचं सांगत वरुण पटेल यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, भाजपानं या सर्व प्रकारावर अद्यापपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 


 




 




Web Title: patidar leader narendra patel allegation bjp offered 1 crore rupees to join party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.