'हाफिज सईदविरोधात अमेरिकेसारखं ऑपरेशन करण्याची क्षमता भारतात नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 06:59 PM2018-11-22T18:59:45+5:302018-11-22T19:05:36+5:30

२६/११ च्या हल्ल्यानंतर आम्ही पाकिस्तानला योग्य तो संदेश दिला होता- चिदंबरम

p Chidambaram Says India Does Not Have Capability To Take Out Hafiz Saeed | 'हाफिज सईदविरोधात अमेरिकेसारखं ऑपरेशन करण्याची क्षमता भारतात नाही'

'हाफिज सईदविरोधात अमेरिकेसारखं ऑपरेशन करण्याची क्षमता भारतात नाही'

Next

नवी दिल्ली: अमेरिकेनं ज्याप्रमाणे ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात घुसून ठार केलं, तशीच कारवाई करुन भारतानं हाफिज सईदचा खात्मा करावा, अशा चर्चा देशात अनेकदा होतात. आता या विषयावर देशाचे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनीही भाष्य केलं आहे. हाफिज सईदच्याविरोधात अमेरिकेसारखं ऑपरेशन करण्याची क्षमता भारतात कधीच नव्हती, असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे. 

भारत मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा कट रचणाऱ्यांचा खात्मा करु शकतो. अमेरिकेनं लादेनविरोधात जशी कारवाई केली. त्याच प्रकारची कारवाई करण्याची क्षमता भारतामध्येही आहे, असं विधान काही तासांपूर्वी लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी केलं होतं. यानंतर चिदंबरम यांनी हाफिजबद्दल विधान केलं. चिदंबरम यांच्या या विधानामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढू शकतात. 'मुंबई हल्ल्यानंतर हाफिज सईद कराचीतल्या सुरक्षितस्थळी होता. आता तर तो दिवसाढवळ्या अगदी मोकाट फिरतो. अमेरिकेनं अबोटाबादमध्ये घुसून ओसामाला कंठस्नान घातलं होतं. मात्र आपल्याकडे तशी क्षमता नाही,' असं चिदंबरम म्हणाले. 

'आपल्याकडे तेव्हादेखील (२००८ मध्ये) तशी क्षमता नव्हती आणि आपल्याकडे आज तशी क्षमता असेल, तर ते माझ्यासाठी आश्चर्यकारक असेल. आम्ही अमेरिकेसारखी कारवाई करायचा प्रयत्न केला असता, तर आम्हाला अपयश आलं असतं आणि त्याचा मोठा फटका बसला असता,' असं चिदंबरम यांनी पुढे म्हटलं. 'आम्ही त्यानंतर कूटनिटीचा वापर करुन पाकिस्तानला योग्य तो संदेश दिला. २६/११ सारखा दुसरा हल्ला झाला, तर चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, असा संदेश आम्ही कूटनितीच्या माध्यमातून पाकिस्तानला दिला होता,' असं चिदंबरम म्हणाले. 
 

Web Title: p Chidambaram Says India Does Not Have Capability To Take Out Hafiz Saeed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.