One and a half year old girl dies after the ambulance carrying her was stuck in a traffic jam | दुर्देवी ! लग्नाच्या वरातीत अॅम्ब्युलन्स अडकल्याने दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

ठळक मुद्देवरातीमुळे एका दीड वर्षाच्या चिमुरडीला आपला जीव गमवावा लागला असल्याची दुर्देवी घटनानंदरई पथरिया गावातील या चिमुरडीला विंचू चावला होता, ज्यानंतर तिला दामोह जिल्हा रुग्णालयात नेण्यात येत होतंवरातीमुळे झालेल्या वाहतूक कोंडीत अडकल्याने रुग्णालयात पोहोचण्याआधीच चिमुरडीचा मृत्यूही वरात माजी कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रीय प्रवक्ता मुकेश नायक यांच्या भाच्याची होती

दामोह -  लग्नाच्या वरातीमुळे अनेकदा रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी आपण पाहिली असेल. पण याच वरातीमुळे एका दीड वर्षाच्या चिमुरडीला आपला जीव गमवावा लागला असल्याची दुर्देवी घटना घडली आहे. नंदरई पथरिया गावातील या चिमुरडीला विंचू चावला होता, ज्यानंतर तिला दामोह जिल्हा रुग्णालयात नेण्यात येत होतं. पण रुग्णवाहिका वरातीमुळे झालेल्या वाहतूक कोंडीत अडकल्याने रुग्णालयात पोहोचण्याआधीच चिमुरडीचा मृत्यू झाला. 

घराबाहेर खेळताना चिमुरडीला विषारी विंचू चावला होता. आधी तिला पथरिया आरोग्य केंद्रात नेण्यात आलं. पण नंतर तिला जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आलं.


जीवन आणि मृत्यूशी झुंज देणा-या दीड वर्षाच्या भूमी विश्वकर्माला रुग्णालयात वेळेत पोहोचवण्यासाठी प्रवास सुरु करण्यात आला. 108 जननी एक्स्प्रेसच्या मदतीने 32 किमी अंतर काही मिनिटांत पुर्ण करण्यात आलं. पण जिल्हा रुग्णालय पोहोचण्याच्या अर्धा किलोमीटर आधी आशिर्वाद गार्डनसोर वरातीच्या गर्दीत रुग्णवाहिका अडकली. रुग्णवाहिका चालक आणि मुलीचे वडिल शकंरलाल यादव यांनी वरातीला रस्ता देण्यासाठी विनंती केली. जवळपास 25 मिनिटं त्यांचे प्रयत्न सुरु होते. आपले प्रयत्न अयशस्वी होत असल्याचं पाहून चालकाने थेट डिव्हायडवर गाडी चढवली आणि रुग्णालयात पोहोचवलं. पण तोपर्यंत सगळं संपलं होतं. कारण रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी भूमीला मृत घोषित केलं. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही वरात माजी कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रीय प्रवक्ता मुकेश नायक यांच्या भाच्याची होती. लोक वरातीमध्ये नाचण्यात इतके दंग होते की, त्यांना रुग्णवाहिकेत मृत्यूशी झुंज देणारी ती चिमुरडी दिसलीच नाही. चिमुरडीच्या मृत्यूला विषारी विंचवापेक्षा वरातीमधील लोकच जास्त कारणीभूत ठरले. 


भूमीच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे की, 'जेव्हा रुग्णवाहिका अडकली होती, तेव्हा चालकाने बाहेर निघण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण लोक रस्ता देतच नव्हते. मुलीचा प्रत्येक श्वास महत्वाचा होता, पण तेथील लोकांना याचं गांभीर्य कळलंच नाही. लोकांना नाचणं जास्त महत्वाचं वाटत होतं, त्यामुळे रुग्णवाहिेकेला रस्ता मिळाल नाही'. 

एसपी विवेक अग्रवाल यांनी ही घटना अत्यंत दु:खद असल्याचं सांगत निष्पक्ष कारवाई करण्याची हमी दिली आहे. जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे. 


Web Title: One and a half year old girl dies after the ambulance carrying her was stuck in a traffic jam
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.