कंधमाल(ओडिशा) : सिनेमाच्या माध्यमातून बिहारचे दशरथ मांझी तर सर्वांना माहितीये.  त्यांनी एकट्याने तब्बल 360 फूट लांब ,30 फूट रूंद आणि 25 फूट उंचीचा डोंगर पोखरून एक रस्ता बनवला होता. ‘माऊंटन मॅन’म्हणून त्यांची जगाला ओळख आहे. आता ओडिशाच्या जालंधर नायक नावाच्या एका व्यक्तीने असाच पराक्रम केला आहे. आपल्या मुलांना शाळेत जाता यावं यासाठी नायक यांनी 8 किलोमीटरचा रस्ता खोदला आहे. 


ओडिशाच्या गुमसाही गाव येथील ही घटना आहे. कंधमालचे रहिवासी जालंधर नायक यांनी गुमसाही गावापासून फुलबानी शहराला जोडणारा एक विशाल डोंगर पोखरून 8 किलोमीटर लांब रस्ता बनवला आहे. आपल्या मुलांना शाळेत जाता यावं यासाठी जालंधर यांनी हा पराक्रम केल्याची माहिती वृत्तसंस्था एएनआयने दिली आहे.  जालंधर नायक हे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात.
 रस्ता नसल्यानं आपल्या मुलाचं शिक्षण अर्धवट राहू नये यासाठी ते गेल्या दोन वर्षांपासून डोंगर फोडून रस्ता तयार करत आहेत. गेल्या दोन वर्षांत त्यांनी 8 किलोमीटर रस्ता तयार केला असून  पुढील 3 वर्षांत त्यांना 7 किलोमीटर रस्ता तयार करायचा आहे. भाजी विक्री करून झाल्यानंतर दिवसातले आठ तास ते डोंगर फोडून त्यातून रस्ता तयार करण्याचं काम करतात. गावात शाळा, अंगणवाडी नाही. त्यासाठी शहरात आम्हाला डोंगर ओलांडून जावं लागतं. रूग्णालयही नसल्याने माझ्या गर्भवती पत्नीला मी स्वतः 3 मैल चालत घेऊन गेलो होतो, त्यामुळे मी रस्ता बनवण्याचं ठरवलं असं जालंधर म्हणाले.

 
मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी गावकऱ्यांना संपूर्ण डोंगर ओलांडून जावा लागतो. गावात पक्का रस्ता नसल्यानं गावकऱ्यांचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे.


Web Title: Odisha's Jalandhar Nayak is the new 'Mountain Man', carves out 8km road to connect school to village
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.