अयोध्येतील जमीन वादाच्या निकालाची आता प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 06:46 AM2019-10-17T06:46:38+5:302019-10-17T06:52:22+5:30

४० दिवसांच्या सुनावणीनंतर निकाल ठेवला राखून

Now waiting for verdict land dispute resolution in Ayodhya | अयोध्येतील जमीन वादाच्या निकालाची आता प्रतीक्षा

अयोध्येतील जमीन वादाच्या निकालाची आता प्रतीक्षा

Next

नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाचा अंतिम निवाडा महिनाभरात होण्याची चिन्हे दिसत आहे. या प्रकरणाची प्रदीर्घ सुनावणी संपल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला. खंडपीठाचे प्रमुख व सरन्यायाधीश रंजन गोगोई १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार असल्याने हा निकाल त्या आधी नक्की दिला जाईल.


खंडपीठावरील न्या. गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण न्या. एस. अब्दुल नझीर यांनी सुनावणी बुधवारी सायंकाळी पाच वाजता संपविण्यात येईल, असे जाहीर केले. त्यानंतर सर्व पक्षकारांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. मागण्या पूर्णांशाने मान्य न झाल्यास पर्यायी निकाल काय दिला जाऊ शकतो, याविषयीचे म्हणणे सर्वांनी तीन दिवसांत सादर करावे, असे न्यायालयाने सांगितले.


अयोध्येतील २.७७ हेक्टर जागेवरील बाबरी मशिदीच्या जागेच्या मालकी हक्काचा हा वाद आहे. यासंबंधी हिंदू व मुस्लीम पक्षकारांनी केलेले पाच दिवाणी दावे अलाहाबाद उच्च न्यायालयात पोहोचले आणि जागेची रामलल्ला विराजमान, निर्मोही आखाडा व सुन्नी वक्फ बोर्ड या तिघांमध्ये समान वाटणी करण्याचा निर्णय २०१० मध्ये झाला. त्याविरुद्धच्या १४ अपिलांची सुनावणी झाली. ६ आॅगस्टपासून सलग ४० दिवस झालेली ही सुनावणी झाली.
मालकी हक्काविषयीच्या दिवाणी अपिलांप्रमाणेच ही अपिले असल्याने
दोन वा तीन न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे सुनावणी शक्य होती, पण विषयाचे महत्त्व, इतिहास, त्यावरून घडलेल्या घटना व राजकीय संदर्भ हे विचारात घेऊन सरन्यायाधीश गोगोई यांनी हे प्रकरण स्वत: हाती घेण्याचे ठरविले. प्रथा मोडून त्यांनी सुनावणीसाठी पाच न्यायाधीशांचे विशेष न्यायपीठही स्थापन केले. सुनावणी व निकालपत्र तयार करून ते जाहीर करणे हे काम सरन्यायाधीशांच्या निवृत्तीच्या आधी पूर्ण व्हावे यासाठी अन्य सर्व कामे बाजूला ठेवण्यात आली.


प्रकरण अंतिम सुनावणीस घेतानाच, आपण निकाल देण्यापेक्षा तडजोडीने वाद मिटत असेल तर पाहावा या हेतूने न्यायालयाने मध्यस्थमंडळ नेमले. साक्षी-पुराव्यांच्या हजारो पानी कागदपत्रांचे भाषांतर पूर्ण होईपर्यंतच्या दोन महिन्यांच्या काळात या मंडळाने फैजाबादमध्ये सर्व पक्षांचे म्हणणे एकून घेतले. परंतु तडजोडीने वाद मिटण्याची शक्यता नाही, असे त्यांनी कळविल्यानंतर सुनावणी सुरू झाली. ती पूर्ण होईपर्यंतही मध्यस्थ मंडळाचा मार्ग खुला ठवला होता. मात्र कोणीच पक्षकार तडजोडीस तयार नसल्याने सर्वोच्च न्यायनिवाडा हाच मार्ग शिल्लक राहिला.


वार्तांकनाबाबत न्यूज चॅनेल्सना एनबीएसएच्या सूचना
न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्डस् अथॉरिटीने (एनबीएसए) सर्व न्यूज चॅनेल्सना या प्रकरणाच्या वार्तांकनाबाबत काही सूचना दिल्या आहेत. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निकाल काय असेल, याचा अंदाज मांडला जाऊ नये, केवळ सुनावणीसंदर्भातील बाबी दाखविल्या जाव्यात, चॅनेल्सवर बाबरी मशीद पाडल्याचे फुटेज दाखवले जाऊ नये, कोणत्याही स्थितीत कुणाच्याही विजयाची दृश्ये प्रसारित केली जाऊ नयेत, चॅनेलवरील वादविवाद कार्यक्रमात कोणाकडूनही जहाल मते मांडली जाऊ नयेत, असेही एनबीएसएने सूचनांमध्ये म्हटले आहे.

Web Title: Now waiting for verdict land dispute resolution in Ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.