सर्व मुस्लिम महिला दहशतवादी नाहीत; शिवसेनेच्या बुरखा बंदीच्या मागणीला आठवलेंचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 10:20 AM2019-05-01T10:20:53+5:302019-05-01T10:40:24+5:30

देशात बुरखा, नकाबवर बंदी घालण्याची शिवसेनेची मागणी

Not all women who wear burqa are terrorists says Union Minister Ramdas Athawale on Shiv Senas proposal to ban burqa | सर्व मुस्लिम महिला दहशतवादी नाहीत; शिवसेनेच्या बुरखा बंदीच्या मागणीला आठवलेंचा विरोध

सर्व मुस्लिम महिला दहशतवादी नाहीत; शिवसेनेच्या बुरखा बंदीच्या मागणीला आठवलेंचा विरोध

Next

मुंबई: बुरखा, नकाबवर बंदी घातली जावी, अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. तशी मागणीदेखील त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली. मात्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी याला विरोध केला आहे. बुरखा परिधान करणारी प्रत्येक महिला दहशतवादी नसते, असं आठवलेंनी म्हटलं आहे. त्यामुळे बुरख्यावरुन महायुतीतली मतमतांतरं समोर आली आहेत. 




श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून भारतातही ‘बुरखा’ तसेच ‘नकाब’ बंदी करावी, अशी मागणी शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली. मुखपत्र सामनाच्या माध्यमातून शिवसेनेकडून ही मागणी करण्यात आली. मात्र एनडीएतील घटक पक्ष असलेल्या रिपाईंनं या विरोधात भूमिका घेतली आहे. 'बुरखा घालणारी प्रत्येक महिला दहशतवादी नसते. जर त्या दहशतवादी असतील, तर त्यांचा बुरखा काढण्यात यावा. बुरखा हा परंपरेचा भाग आहे. त्यामुळे तो परिधान करणं हा मुस्लिम महिलांचा हक्क आहे. त्यामुळे देशात बुरख्यावर बंदी आणली जाऊ नये,' अशा शब्दांमध्ये आठवलेंनी रिपाईंची भूमिका स्पष्ट केली. 



श्रीलंकेत बॉम्ब स्फोट झाल्यानंतर तिथल्या सरकारनं बुरख्यावर बंदी घातली. त्याचा संदर्भ देत भारतातही अशा प्रकारची बंदी लागू करावी, अशी मागणी शिवसेनेनं केली. यावेळी शिवसेनेनं इतर देशांमध्ये घालण्यात आलेल्या बंदीचाही संदर्भ दिला. 'फ्रान्समध्येही दहशतवादी हल्ला होताच तेथील सरकारने बुरखा बंदी केली. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात व ब्रिटनमध्येही हेच घडले आहे. मग याबाबतीत हिंदुस्थान मागे का?' असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला.



'फेस मास्क किंवा इतर साधनांनी चेहरा झाकणार्‍या व्यक्ती राष्ट्रीय आणि सामाजिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा नकाब परिधान करणे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य ठरेल, असे जाहीर करून श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी साहस व धैर्याचे दर्शन घडवले. रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार? पंतप्रधान मोदी आज अयोध्येला निघाले आहेत, म्हणूनच हा प्रश्न,' असं शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे. 

Web Title: Not all women who wear burqa are terrorists says Union Minister Ramdas Athawale on Shiv Senas proposal to ban burqa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.