No Confidence Motion : अविश्वास ठरावावरील चर्चेआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 07:54 AM2018-07-20T07:54:20+5:302018-07-20T09:04:14+5:30

मोदी सरकारविरोधात तेलगू देसम व काँग्रेसने मांडलेल्या अविश्वास ठरावावर आज लोकसभेत चर्चा होणार आहे.

No Confidence Motion: India will be watching us closely, tweets PM Narendra Modi | No Confidence Motion : अविश्वास ठरावावरील चर्चेआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट, म्हणाले...

No Confidence Motion : अविश्वास ठरावावरील चर्चेआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट, म्हणाले...

Next

नवी दिल्ली - मोदी सरकारविरोधात तेलगू देसम व काँग्रेसने मांडलेल्या अविश्वास ठरावावर शुक्रवारी लोकसभेत चर्चा होणार आहे. या ठरावाच्या निमित्ताने विरोधी पक्ष सरकारवर जोरदार तुटून पडतील. सरकारचे अपयश देशापुढे मांडण्याचे काम आम्ही करू, असे काँग्रेसने म्हटले आहे. मोदी सरकारवरील हा पहिलाच अविश्वास ठराव आहे. 

दरम्यान, या अविश्वास ठरावावरील चर्चेआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे. ''संसदीय लोकशाहीसाठी आजचा महत्त्वाचा दिवस आहे. सखोल आणि अडथळ्याविना चर्चा होईल, अशी अपेक्षा आहे'', असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. संपूर्ण देश आज आपल्याला जवळून पाहत आहे, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले  आहे.

(No Confidence Motion : अविश्वास ठरावावर शिवसेनेचं अद्यापही तळ्यात-मळ्यात)


दरम्यान, सरकारच्या चार वर्षांतील कामगिरीचे कौतुक भाजपा व मित्रपक्ष चर्चेमध्ये निश्चितच करतील. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदीही भाषण करतील आणि ते अतिशय आक्रमक व विरोधकांवर हल्ला चढविणारे असू शकेल. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका असल्याने विरोधक व सरकार पक्ष यांना या ठरावाच्या निमित्ताने जोरदार आरोप-प्रत्यारोप होतील, हे उघड आहे.

या ठरावावरील चर्चेच्या वेळी आपल्या सदस्यांनी उपस्थित राहावे, यासाठी काँग्रेस, भाजपा, तेलगू देसम, अण्णा द्रमुक, बिजू जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस, राजद यांसह जवळपास सर्वांनी व्हिप (पक्षादेश) जारी केला आहे. शिवसेनेने मात्र ‘व्हिप’ सायंकाळी उशिरा मागे घेतला. आता ठाकरे शुक्रवारी भूमिका स्पष्ट करतील. शिवसेना कदाचित हजर राहून मतदान न करण्याचा किंवा मतदानाला गैरहजर राहण्याचा निर्णयही घेईल.  

कोण बाजूने, कोण विरोधात?
ठरावाला शिवसेना व अण्णा द्रमुक हे पक्ष पाठिंबा देणार नाहीत, तर तेलंगणा राष्ट्र समितीही या ठरावाला पाठिंबा देण्याची शक्यता कमी आहे. बिजू जनता दलाने आपली भूमिका उद्या जाहीर करण्याचे ठरविले आहे. हे दोन्ही पक्ष कदाचित मतदानात भागच घेणार नाहीत, असे सांगण्यात येते आहे.







चर्चेला कोणाला किती वेळ?
भाजपा : ३.३३ तास
काँग्रेस : ३८ मिनिटे
अद्रमुक : २९ मिनिटे
तृणमूल : २७ मिनिटे
बीजेडी : १५ मिनिटे
शिवसेना : १४ मिनिटे
तेलगू देसम : १३ मिनिटे
टीआरएस : ९ मिनिटे
माकप : ७ मिनिटे
सपा : ६ मिनिटे
राष्ट्रवादी : ६ मिनिटे
लोजपा : ५ मिनिटे

Web Title: No Confidence Motion: India will be watching us closely, tweets PM Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.