कामकाज नाही, तर वेतनही नको; एनडीएच्या खासदारांनी सोडले पगारावर पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2018 08:47 AM2018-04-05T08:47:07+5:302018-04-05T08:47:07+5:30

संसदेचे कामकाज होऊ न शकल्याने एनडीएच्या खासदारांनी २३ दिवसांचे वेतन न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

nda mps wont take pay and allowance for 23 wasted days | कामकाज नाही, तर वेतनही नको; एनडीएच्या खासदारांनी सोडले पगारावर पाणी

कामकाज नाही, तर वेतनही नको; एनडीएच्या खासदारांनी सोडले पगारावर पाणी

googlenewsNext

संसदेच्या अधिवेशनात होत असलेल्या गोंधळावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. संसदेच्या अधिवेशनात विविध मुद्यांवरुन मोठा गदारोळ झाला. त्यामुळे संसदेचे कामकाज होऊ शकलेले नाही. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) खासदारांनी २३ दिवसांचे वेतन न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. 

गदारोळामुळे कामकाज होऊ न शकल्याने संसदेच्या अधिवेशनाचा अमूल्य वेळ वाया गेला. याचे पडसाद कॅबिनेटच्या बैठकीत पाहायला मिळाले. या बैठकीत बहुतांश खासदारांनी वेतन न स्वीकारण्याची भूमिका मांडली. यामुळे जनतेमध्ये चांगला संदेश जाईल, असे मत अनेक खासदारांनी मांडले. विरोधकांमुळेच संसदेचे कामकाज होऊ शकले नाही, असा संदेश लोकांपर्यंत जावा, असा भाजपचा प्रयत्न आहे. यासोबतच संसदेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ एनडीएचे खासदार निदर्शनेदेखील करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

संसदेच्या अधिवेशनाचा वेळ वाया गेल्याने अनेक विधेयकांना मंजुरी मिळू शकली नाही. यावरुन संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. 'एनडीएच्या खासदारांनी २३ दिवसांचे वेतन आणि भत्ते न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या कामातून लोकांची सेवा होत असेल, तरच आम्ही वेतन घ्यायला हवे, असे आम्हाला वाटते. आम्हाला अधिवेशनात  विविध मुद्यांवर चर्चा करायची होती. मात्र काँग्रेसमुळे  लोकसभा आणि राज्यसभेचा अमूल्य वेळ वाया गेला,' असे ट्विट करत अनंत कुमार यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 
 

Web Title: nda mps wont take pay and allowance for 23 wasted days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.