येणारे 'दिन' फारसे 'अच्छे' नाहीत; चीनने वर्तवलं मोदी सरकारचं भाकित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 12:45 PM2018-07-09T12:45:59+5:302018-07-09T12:48:26+5:30

चीनच्या वृत्तसंस्थेनं रविवारी लिहिलेल्या लेखात मोदी सरकारसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे.

Narendra Modi's popularity is falling, China prediction on Lok Sabha Election | येणारे 'दिन' फारसे 'अच्छे' नाहीत; चीनने वर्तवलं मोदी सरकारचं भाकित

येणारे 'दिन' फारसे 'अच्छे' नाहीत; चीनने वर्तवलं मोदी सरकारचं भाकित

नवी दिल्लीः 'अच्छे दिन'चं आश्वासन देत सत्तेवर आलेल्या  भाजपा आणि मोदी सरकारसाठी येणारे 'दिन' फारसे 'अच्छे' नसल्याचं भविष्य भारताचा बेभरवशी शेजारी असलेल्या चीनने वर्तवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता सातत्याने घटत असून भारतातील सार्वत्रिक निवडणूक वेळेआधीच होईल, असा अंदाज शिन्हुआ या चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेनं व्यक्त केला आहे. 

२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशभरात मोदी लाट उसळली होती. या अभूतपूर्व यशानंतर, पुढच्या तीन वर्षांत अनेक राज्यांमध्ये भाजपाचं कमळ उमललं. त्यांचा विजयरथ रोखण्यात काँग्रेससह सर्वच विरोधक निष्प्रभ ठरत होते. परंतु, येत्या काळातील निवडणुका भाजपासाठी कठीण असतील, असं चित्र आता दिसू लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर, चीनच्या वृत्तसंस्थेनं रविवारी लिहिलेल्या लेखातही मोदी सरकारसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. 

गो-हत्याबंदी आणि गोमांस प्रकरणात जमावाकडून झालेल्या हत्यांमुळे मोदी सरकारची लोकप्रियता घसरू लागली. त्यानंतर, नोटाबंदी आणि जीएसटीमुळे जनतेची नाराजी अधिकच वाढली. त्याचाच फटका भाजपाला पोटनिवडणुकांमध्ये बसला. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि बिहारमधील पोटनिवडणुकीत त्यांना आपले गड गमवावे लागले. त्यामुळे येत्या काळात भाजपाला सरकारविरोधी लाटेचा सामना करावा लागेल, असं शिन्हुआमधील लेखात नमूद करण्यात आलंय. लोकनीती आणि सीएसडीएसच्या सर्वेक्षणाचाही त्यांनी आधार घेतला आहे. मोदी सरकारने अपेक्षाभंग केल्याची भावना वाढत असल्याचं या सर्वेक्षणातून समोर आलं होतं. 

असं असलं तरी, भारतीय राजकारणाचे बीजिंगमधील जाणकार आपलं मत मोदींच्या पारड्यातच टाकताना दिसताहेत. लोकसभेच्या येत्या निवडणुकीतही भाजपाचा विजय होईल, पण नव्या मोदी सरकारचं संख्याबळ आजच्यापेक्षा कमी असेल, असा त्यांचा अंदाज आहे.     
 

Web Title: Narendra Modi's popularity is falling, China prediction on Lok Sabha Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.