पवारजी, तुम्ही मोदीविरोधकांचे नेतृत्व करा, भेटीसाठी लागली रीघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 03:34 AM2018-03-28T03:34:53+5:302018-03-28T03:34:53+5:30

केंद्र की सत्तासे मोदी सरकार को किसी भी हाल में हटाना है। इस मूव्हमेंट को आप लीड किजिए, देश में कोई भी आपकी बात टालेगा नही।’

Mr. Pawar, you have to lead the anti-Modi campaign, visit Rig | पवारजी, तुम्ही मोदीविरोधकांचे नेतृत्व करा, भेटीसाठी लागली रीघ

पवारजी, तुम्ही मोदीविरोधकांचे नेतृत्व करा, भेटीसाठी लागली रीघ

Next

सुरेश भटेवरा 
नवी दिल्ली : आगामी सार्वत्रिक निवडणुकीत मोदी सरकारला पराभूत करण्यासाठी देशातल्या सर्व विरोधी पक्षांनी छोटे स्वार्थ बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे. त्यासाठी हवा तो त्याग करण्यास मी आणि माझा पक्षही तयार आहे, अशी ग्वाही प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना दिली.

शरद पवारांसह मोदीविरोधी नेत्यांच्या भेटीसाठी ममता बॅनर्जी येणार अशी चर्चा सोमवारपासून होती. मंगळवारी राज्यसभेचे व लोकसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर ममता बॅनर्जी पवारांना भेटण्यासाठी संसद भवनात राष्ट्रवादीच्या कार्यालयात गेल्या. खा. सुप्रिया सुळे आणि वंदना चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. ममता आधी पवारांच्या पाया पडल्या व म्हणाल्या, ‘पवारजी, पुरे देशमें आप सबसे सीनिअर नेता हो, आपके मार्गदर्शन की हम सब को आवश्यकता है। केंद्र की सत्तासे मोदी सरकार को किसी भी हाल में हटाना है। इस मूव्हमेंट को आप लीड किजिए, देश में कोई भी आपकी बात टालेगा नही।’

विरोधकांच्या ऐक्याबाबत त्यांच्यात तासभर चर्चा झाली. ममता म्हणाल्या की, ‘काँग्रेसबाबत माझ्या मनात काही शंका आहेत. मात्र, सोनिया गांधींबद्दल मला आस्था आहे. मोदी सरकार सत्तेतून बाहेर घालविण्यासाठी कोणताही त्याग करावा लागला, तरी माझी त्यासाठी तयारी आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, ओमर अब्दुल्लांपासून स्टॅलिनपर्यंत विरोधकांचे अभेद्य ऐक्य उभे राहावे अशी माझी इच्छा आहे.’ त्यावर शरद पवार म्हणाले की, प्रत्येक राज्यात कोणत्या पक्षाची किती ताकद आहे, त्या प्रमाणातच त्यांना प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, या सूत्रानुसारच विरोधकांची महाआघाडी तयार होऊ शकेल. आपसातले मतभेद बाजूला ठेवण्याची मानसिक तयारी तर काँग्रेससह सर्वच पक्षांनी केली आहे त्यामुळे हा प्रश्न सोडवता येईल, असा मला विश्वास आहे. अभिषेक सिंगवींना बंगालमधून राज्यसभेवर पाठवून आपण चांगली सुरूवात केली आहे.

कर्नाटक निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याआधीच भाजपा प्रवक्ते मालवीय यांनी टिष्ट्वटरवर मतदान व निकालाच्या तारखा जाहीर केल्या. याचा संदर्भ निघताच त्वेषाने ममता बॅनर्जी म्हणाल्या, की, निवडणूक आयोगाने याची चौकशी केली पाहिजे. राजकीय पक्षांना विश्वासात घेतले पाहिजे. या बैठकीत, शिवसेनेसह अन्य मोदी विरोधकांचाही विषय निघाला. सामना मुखपत्रातून शिवसेनेने मोदी सरकारवर अनेक प्रहार केले आहेत. भविष्यात शिवसेनेची नेमकी काय भूमिका असेल, याबाबत आपण प्रतीक्षा करावी, असा सूर यावेळी व्यक्त झाला. चंद्राबाबू, चंद्रशेखर राव आदींच्या संपर्कात आपण राहावे, अशी सूचनाही पवारांनी बॅनर्जी यांना केली. ममता बॅनर्जींबरोबर तृणमूलचे दिनेश त्रिवेदी होते, तर पवार यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, तारीक अन्वर, सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, धनंजय महाडिक व माजिद मेमन उपस्थित होते.

भेटीसाठी लागली रीघ
पत्रकारांना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, सोनिया गांधी रुग्णालयात आहेत. त्यांना त्रास देण्याची तूर्त गेरज नाही. त्यानंतर, तृणमूल काँग्रेसच्या संसदेतील कार्यालयात, विरोधी पक्षांच्या संसदेतील नेत्यांची दीदींना भेटण्यासाठी रीघच लागली. त्यांची भेट घेणाऱ्यांमध्ये शिवसेनेचे संजय राऊत, राजदच्या मीसा भारती, तेलगू देशमचे माजी मंत्री वाय. एस. चौधरी, तेलंगणा राष्ट्र समितीच्या मुख्यमंत्र्यांच्या कन्या के. कविता, द्रमुकच्या कणिमोळी, तसेच समाजवादी, बसपा, बीजेडी, तेलंगणा राष्ट्र समिती, जद (यू. शरद यादव गट) व वायएसआर काँग्रेस आदींच्या संसदेतील नेत्यांचा समावेश होता. माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी व शत्रुघ्न सिन्हा हेही बुधवारी भेटणार आहेत. राम जेठमलानींच्या भेटीचीही शक्यता आहे.

Web Title: Mr. Pawar, you have to lead the anti-Modi campaign, visit Rig

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.