नवी दिल्ली: नोटबंदीच्या वर्षपूर्ती निमित्ताने अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) चार्जशिटद्वारे संशयीत व्यवहार करणा-या नावांचा खुलासा झाला आहे. या यादीत बसपा सुप्रीमो मायावती, राज्यसभेचे खासदार आणि राजदचे अध्यक्ष लालू यादव यांची मोठी मुलगी मीसा भारती यांच्यासह अनेक मोठ्या हस्तींच्या नावांचा समावेश असल्याचा दावा इंग्रजी न्यूज चॅनल टाइम्स नाऊने केला आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या यादीच्या हवाल्याने चॅनलने हा दावा केला आहे.  या सर्वांवर अंमलबजावणी संचालनालयाची बारीक नजर आहे. कोर्टात चार्जशीट दाखल करण्यासाठी ईडीने ही यादी तयार केली असून अद्यापपर्यंत कोर्टात ही यादी देण्यात आलेली नाही. 
या यादीत नाव असलेल्यांनी नोटबंदी लागू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात काळा पैसा सुरक्षित केला असा दावा चॅनलने केला आहे. नोटबंदीनंतर जवळपास 11000 कोटी रूपयांचा व्यवहार संशयास्पद असल्याचं या वृत्तात म्हटलंय. या संशयीत व्यवहाराशी निगडीत जवळपास 4000 केसं मनी लॉन्ड्रिंग आणि फेमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल करण्यात आल्या आहेत. याशिवाय देशभरात जवळपास 800 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. तर 600 जणांना नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागण्यात आलं आहे. यासंबंधी अंमलबजावणी संचालनालयाने आतापर्यंत 54 जणांना अटक केली आहे. 
भारताबाहेर सौदी अरेबिया, दुबई, मलेशिया आणि हॉंगकॉंगपर्यंत परदेशी चॅनल्सच्या माध्यमातून हा काळ्यापैशाची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली आहे. अनेक व्यापा-यांनी काळं धन संपवण्यासाठी शेल कंपन्या आणि कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटींचा आधार घेतला. काळा पैसा पांढरा करण्यासाठी स्टॉक मार्केटचाही वापर करण्यात आला.