Man shot at by cousin, a BJP supporter, for voting for Congress in Haryana | धक्कादायक! काँगेसला मतदान केलं म्हणून भाजपा समर्थकाने स्वत:च्या भावावर झाडली गोळी
धक्कादायक! काँगेसला मतदान केलं म्हणून भाजपा समर्थकाने स्वत:च्या भावावर झाडली गोळी

झज्जर - देशभरात लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे. सहा टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर अंतिम टप्प्यातील मतदान येत्या 19 मे रोजी होणार आहे. निवडणुकीनंतर लोकसभा निकालांवर सर्वांचे लक्ष आहे. देशभरातील कानाकोपऱ्यात असो वा घरात सगळीकडे लोकसभा निवडणुकीची चर्चा रंगली जातेय. कधी कधी या चर्चा इतक्या गंभीर होतात त्यातून अनेक हिंसक घटना घडतात. 

हरियाणातील झज्जर याठिकाणी अशीच एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. झज्जर येथे सोमवारी एका भाजपा समर्थकाने राजकीय प्रेमापोटी स्वत:च्या भावावर गोळीबार केला आहे. भाजपा समर्थकाच्या भावाने काँग्रेसला मतदान केल्याचा राग मनात धरत हे कृत्य केल्याचं समोर आलेलं आहे. आपल्या भावानेही भाजपाला मतदान करावं अशी इच्छा भाजपा समर्थकाची होती मात्र भावाने काँग्रेसला मतदान केल्याचा राग अनावर झाला आणि त्याने स्वत:च्या भावावर गोळीबार केला. 

स्थानिक लोकांच्या माहितीनुसार 12 मे रोजी काँग्रेस समर्थक आणि भाजपा समर्थकांमध्ये काही कारणास्तव वाद झाला होता. मतदानानंतर भाजपा समर्थक धर्मेंद्रने त्याचा भाऊ राजा यांच्यावर गोळीबार केला. राजा याने काँग्रेसला मतदान केलं होतं. या घटनेदरम्यान मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या आईला जबर दुखापत झाली. त्यामुळे आई आणि मुलावर दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

झज्जर पोलीस ठाण्याचे अधिकारी रमेश कुमार यांनी सांगितले की, सोमवारी आम्हाला सैलाना गावात गोळीबारी झाल्याची माहिती मिळाली. जेव्हा आम्ही त्याठिकाणी पोहचलो तेव्हा आरोपी धर्मेंद्र फरार झाला होता. बेकायदेशीररित्या हत्यार ठेवून गोळीबारी करण्याचा गुन्हा धर्मेंद्र याच्यावर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करुन आरोपीचा शोध घेत आहे. 

पिडिताच्या आईने सांगितले की, धर्मेंद्र आणि राजा यांच्यात मतदानाच्या दिवशी भांडण झालं होतं. धर्मेंद्रने राजा याला भाजपाच्या समर्थनात मतदान करण्यास सांगितले मात्र राजा याने धर्मेंद्रचे म्हणणं ऐकलं नाही. त्यामुळे सोमवारी रागाच्या भरात धर्मेंद्रने राजावर गोळी चालवली. त्यात तो जखमी झाला. जवळच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या राजा याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 
 


Web Title: Man shot at by cousin, a BJP supporter, for voting for Congress in Haryana
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.