लोया प्रकरण सुनावणीत जोरदार शब्दिक खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 04:55 AM2018-02-06T04:55:05+5:302018-02-06T04:55:14+5:30

मुंबईतील सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश बी. एच.लोया यांच्या चार वर्षांपूर्वी नागपूर येथे झालेल्या संश्यास्पद मृत्यूची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठीच्या याचिकांवरील सुनावणीत सोमवारी सर्वोच्च न्यायालयात न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांची याचिकाकर्त्याच्या वकिलाशी आणि वकिलांची आपसात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली.

Loyalty case hearing strongly worded | लोया प्रकरण सुनावणीत जोरदार शब्दिक खडाजंगी

लोया प्रकरण सुनावणीत जोरदार शब्दिक खडाजंगी

Next

नवी दिल्ली : मुंबईतील सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश बी. एच.लोया यांच्या चार वर्षांपूर्वी नागपूर येथे झालेल्या संश्यास्पद मृत्यूची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठीच्या याचिकांवरील सुनावणीत सोमवारी सर्वोच्च न्यायालयात न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांची याचिकाकर्त्याच्या वकिलाशी आणि वकिलांची आपसात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली.
ही वादावादी सुरु असताना प्रामुख्याने न्या. चंद्रचूड हेच बोलत होते व सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा व न्या. अजय खानविलकर शांत होते. एका टप्प्याला न्या. चंद्रचूड यांनी, ‘आवाज चढवून तुम्ही आम्हाला गप्प बसवू शकत नाही’, असे ज्येष्ठ वकील दुश्यंत दवे यांना सुनावले. नंतर याचिकाकर्त्यांचे वकील आपसात आरोप-प्रत्यारोप करू लागले तेव्हा न्या. चंद्रचूड यांनी न्यायदालनाच्या भिंतींवर लावलेल्या न्या. एम. एच. कणिया आणि न्या. बी. के. मुखर्जी यांच्या रंगचित्रांकडे पाहात ‘निदान यांच्यासमोर तरी अदबीने वागा’ असे सुनविले. वकिलांमधील आपसातील वादावादी पाहून न्या. चंद्रचूड यांनी ‘मासळी बाजार तरी यापेक्षा बरा!’, असाही शेरा मारला.
सत्य बाहेर येऊ नये यासाठी आपला आवाज दडपण्याचा प्रयत्न होतो आहे, असा आरोप ‘बॉम्बे लॉयर्स असोसिएसन’चे वकील दवे यांनी केला आणि आपली वकिलीची सनद काढून घेण्याच्या बार कौन्सिलच्या कथित हालचाली सुरू असल्याचा उल्लेख केला. आपल्याला न्याय मिळेल असे वाटत नाही. न्यायाधीशांनी विवेकबुद्धीला स्मरून प्रकरण ऐकायला हवे, असे दवे म्हणाले. त्यावर न्या. चंद्रचूड यांनी त्यांना, विवेकाने कसे वागायचे ते आम्हाला शिकवू नका, आम्ही प्रत्येक गोष्ट निष्पक्षतेने तपासून पाहू, याची खात्री बाळगा, असे सुनावले.
दुसरे याचिकाकर्ते पत्रकार बंधुराज लोणे यांचे ज्येष्ठ वकील पल्लव सिसोदिया यांनी लॉयर्स असोसिएशनच्या याचिकेमुळे या प्रकरणास निष्कारण वेगळे वळण लागून विषय भलतीकडेच नेला
जात आहे, असे प्रतिपादन केले.
यावर अ‍ॅड. दवे यांनी, तुम्ही केसला सुरुंग लावताय, असा सिसोदिया यांच्यावर आरोप केला.
त्यावर संतापलेल्या सिसोदिया यांनी, तुम्हाला काय वाटते याची आम्हाला पर्वा नाही. यानंतर सिसोदिया यांनी काही आक्षेपार्ह शब्दही वापरले. परंतु न्या. चंद्रचूड यांनी भानावर आणल्यावर सिसोदिया यांनी दिलगिरी व्यक्त केली. या शब्दिक खडाजंगीमध्ये दवे मध्येच महाराष्ट्र सरकारतर्फे काम पाहणारे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांच्यावरही घसरले. साळवे अमित शहा यांना वाचविण्याचे काम करीत आहेत, असा त्यांनी आरोप केला.
अमित शहा स्वत:ची काळजी घ्यायला समर्थ आहेत, असा प्रतिटोला सिसोदिया यांनी यावेळी लगावला. साळवे मात्र या दोघांमध्ये न पडता
न्या. चंद्रचूड यांना उद्देशून म्हणाले की, न्यायाधीश महाराज स्वत: सौजन्याने वागले तरच इतर सौजन्याने वागतात, हेच खरे!
>सुनावणी ९ फेब्रुवारीला
तिसºया याचिकाकर्त्या तेहसीन पूनावाला यांचे ज्येष्ठ वकील व्ही. गिरी यांनी लोया मृत्यूची राज्य सीआयडीने केलेला तपास ही निव्वळ आरामखुर्चीत बसून केलेली चौकशी होती, असे प्रतिपादन केले व न्यायालयास स्वतंत्र चौकशीचा आदेश देण्याची विनंती केली. याचिकांवरील पुढील सुनावणी ९ फेब्रुवारी रोजी होईल.

Web Title: Loyalty case hearing strongly worded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.