लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला 'न्यू इंडिया'चा नारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2017 07:16 AM2017-08-15T07:16:11+5:302017-08-15T16:03:51+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन चौथ्यांदा भाषण केले.

LIVE: Prime Minister Narendra Modi will address the Red Fort | लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला 'न्यू इंडिया'चा नारा

लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला 'न्यू इंडिया'चा नारा

Next

नवी दिल्ली, दि. 15 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करुन  सलग चौथ्यांदा देशवासियांना संबोधित केले.   देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वातंत्र्य दिनाच्या या शुभप्रसंगी देशवासियांना कोटी-कोटी शुभेच्छा. संपूर्ण देश आज स्वातंत्र्य दिनासोबत जन्माष्टमीचाही उत्सव साजरा करत आहे. सुदर्शन चक्राधारी मोहनपासून ते चरखाधारी मोहनपर्यंतचा वारसा आपल्याला लाभला आहे.  
देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाच्या गौरवासाठी हजारो लोकांनी बलिदान दिलं, यातना-दु:ख सोसले, त्या सर्व वीरांना सव्वाकोटी देशवासियांतर्फे नमन करतो, असेही उद्गार यावेळी पंतप्रधान मोदींनी काढले. 

विकासाच्या शर्यतीत आपण सर्व एकत्रितरित्या पुढे जाण्यासाठी काम करुया.  जीएसटीमुळे देशाची कार्यक्षमता 30 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत डिजिटल देवाण-घेवाणीत 34 टक्के वाढ झाली आहे. जीएसटीमुळे वेळेसोबतच हजारो कोटीही वाचले आहेत.  देशाला ट्रॅकवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र असे करत असताना गती कमी होऊ देणार नाही, असे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले. हा देश बुद्धांचा आहे, गांधीचा आहे, येथे  आस्थेच्या नावाखाली होणारा हिंसाचार खपवून घेणार नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कट्टरतावाद्यांना खडसावले आहे. 
डाळ खरेदीचा इतिहास 
सरकारमध्ये डाळ खरेदी करण्याची प्रथा कधीच नव्हती,यावर्षी 16 लाख टन डाळ खरेदी केली. सरकारनं शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं आणि 16 लाख टन डाळ खरेदी करुन इतिहास रचला. 

गोरखपूर प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी शोक केला व्यक्त 
गोरखपूरच्या बीआरडी रूग्णालयात 65 हून अधिक मुलांचा मृत्यू झाला. याचादेखील उल्लेख मोदींनी आपल्या भाषणात केला. या मुलांचा मृत्यू व काहींचा नैसर्गिक आपत्तीत जीव गेला. याचे दु:ख असून देश या मृतांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी उभा आहे, असे यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.

आव्हानांना सामना करण्यास भारत सज्ज
चीनसोबत डोकलामवरुन सुरु असलेल्या वादावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत सर्व प्रकारच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचं सांगितलं आहे. मग ते आव्हान समुद्री भागातून असो अथवा सीमेवरुन, भारत सर्व आव्हानांशी दोन हात करण्यासाठी तयार असल्याचं पंतप्रधान मोदी बोलले आहेत. मोदींनी यावेळी चीनचा उल्लेख न करता हा इशारा दिला आहे. देशाची सुरक्षा आपल्या सरकारची प्राथमिकता असून, सीमारेषा सुरक्षित ठेवण्यासाठी जवनांना तैनात करण्यात आल्याचंही ते बोलले आहेत. 


काश्मीर मुद्याचाही उल्लेख
यावेळी जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवरही मोदींनी आपली भूमिका मांडली. 'न गाली से, न गोली से...परिवर्तन होगा हर  परिवर्तन होगा कश्मिरी को गले लगाने से',असे सांगत मोदी पुढे म्हणाले की, दहशतवादाविरोधातील लढाई सुरूच राहील. काश्मीरचा विकास करायचा आहे.
ट्रिपल तलाकविरोधात आंदोलन 
ट्रिपल तलाकविरोधात महिलांनी देशात आंदोलन उभारले आहे. या महिलांचे अभिनंदन करतो. त्यांना पाहिजेत ती मदत करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

LIVE UPDATES

08:05 AM - काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधातील आमचा लढा सुरूच राहील, आम्ही टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करतोय- पंतप्रधान नरेंद्र मोदी
08:03 AM - बराच काळ मुख्यमंत्री राहिल्यानं देशातील विकासात राज्यांचं महत्त्व माहीत आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी
08:01 AM - तरुणांना नोक-या मिळतील, तेव्हाच देशाची प्रगती होईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी
07:59 AM - गोळ्या किंवा शिव्यांनी नव्हे, तर काश्मिरींच्या गळाभेटीनंच जम्मू-काश्मीरमध्ये परिवर्तन होईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी
07:57 AM - दहशतवादाविरोधात जगातील अनेक देशांची भारताला मदत- पंतप्रधान नरेंद्र मोदी
07:56 AM - जम्मू-काश्मीरचा विकास करण्याचा आमचा संकल्प आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी
07:56 AM - जीएसटीमुळे व्यापार क्षेत्र मजबूत झालं- पंतप्रधान नरेंद्र मोदी
07:55 AM - गोरखपूरमधील मुलांच्या मृत्यूप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं दुःख
07:54 AM - प्रत्येक गावागावात वीज पोहोचवली आहे, देश प्रगती करतोय- पंतप्रधान नरेंद्र मोदी
07:53 AM - जेव्हा आम्ही सर्जिकल स्ट्राइक केलं, त्यावेळी भारताची ताकद जगाला मान्य करावी लागली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
07:51 AM - गरिबांना लुटून तिजोरी भरणा-यांना आजही सुखाची झोप येत नाही- पंतप्रधान नरेंद्र मोदी
07:50 AM - देशातील अंतर्गत सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी
07:49 AM - चालतंय ते चालू द्या, हा जमाना गेला, आता बदल होतोय, जमाना बदलतोय -पंतप्रधान नरेंद्र मोदी

07:47 AM - नैराश्याला मागे टाकून आत्मविश्वासानं देशाची प्रगती साधायची आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी
07:47 AM- तरुणांना देशाला प्रगतीच्या मार्गावर नेण्याचं भाग्य मिळतंय, तरुणांना देशाच्या विकासासाठी पुढे येण्याचं मी आवाहन करतो- पंतप्रधान नरेंद्र मोदी
07:46 AM- 21व्या शतकात जन्मलेल्या तरुणांसाठी हे वर्षं महत्त्वपूर्ण आहे-पंतप्रधान नरेंद्र मोदी
07:45 AM- सुदर्शन चक्रधारी मोहनपासून चरखाधारी मोहन करमचंद गांधींपर्यंत देशाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी
07:43 AM- देशातील सामूहिक शक्तीच्या साहाय्यानं परिवर्तन आणणं शक्य- पंतप्रधान नरेंद्र मोदी
07:43 AM- देशाच्या मागे सामूहिक शक्तीची ताकद आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी
07:42 AM- न्यू इंडियाच्या संकल्पनेनं देशाला प्रगतिपथावर न्यायचं आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी
07:41 AM- देशातला बराच भाग आज नैसर्गिक आपत्तीशी लढतोय- पंतप्रधान नरेंद्र मोदी
07:38 AM- चांगला पाऊस देशातील पिकं फुलवण्यासाठी मदत करतो- पंतप्रधान नरेंद्र मोदी
07:37 AM- देशाच्या स्वातंत्र्य, गौरवासाठी ज्यांनी बलिदान दिलं, अशा महानुभावांना शतशः नमन करतो-पंतप्रधान नरेंद्र मोदी


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर महात्मा गांधी यांना केले अभिवादन 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.



केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी निवासस्थानी केले ध्वजारोहण


Web Title: LIVE: Prime Minister Narendra Modi will address the Red Fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.