भारताचा विजय मोठाच, पण कुलभूषण जाधव यांची लगेच सुटका नाही, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 07:49 PM2019-07-17T19:49:25+5:302019-07-17T19:57:23+5:30

आयसीजेच्या निकालावर कुठलाही आक्षेप घेता येत नाही.

Kulbhushan Jadhav Verdict in ICJ: Big Victory for India, but Kulbhushan could not come back immediately | भारताचा विजय मोठाच, पण कुलभूषण जाधव यांची लगेच सुटका नाही, कारण...

भारताचा विजय मोठाच, पण कुलभूषण जाधव यांची लगेच सुटका नाही, कारण...

Next
ठळक मुद्देकुरापतखोर पाकिस्तानला आज आंतरराष्ट्रीय न्यायालयानं 'जोर का झटका' दिला आहे.आता कुलभूषण जाधव यांना वकील देणं पाकिस्तानसाठी बंधनकारक आहे.परंतु, या निकालानंतरही कुलभूषण जाधव यांची लगेच सुटका होणं कठीण आहे.

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना जाळ्यात अडकवून भारताची कोंडी करायला निघालेल्या पाकिस्तानचं आज पुन्हा जागतिक स्तरावर वस्त्रहरण झालं आहे. खोटं बोलण्यात, कांगावा करण्यात पटाईत असलेल्या कुरापतखोर पाकिस्तानला आज आंतरराष्ट्रीय न्यायालयानं 'जोर का झटका' दिला आहे. कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेवरील स्थगिती कायम ठेवत, त्यांना सुनावल्या गेलेल्या सर्व शिक्षांचा पुनर्विचार करावा, त्यांना कायदेशीर मदत द्यावी, त्यांचे राजनैतिक अधिकार कायम राहतील याची काळजी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिले आहेत. भारताच्या मुत्सद्देगिरीला मिळालेलं मोठं यश म्हणूनच या निकालाकडे पाहिलं जातंय. परंतु, या निकालानंतरही कुलभूषण जाधव यांची लगेच सुटका होणं कठीण असल्याचं मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मांडलं आहे.


आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल पाकिस्तानला झटका देणारा आहे. आयसीजेच्या निकालावर कुठलाही आक्षेप घेता येत नाही. त्यामुळे त्यांनी दिलेल्या निर्देशांचं पाकिस्तानला पालन करावंच लागेल. परंतु, कुलभूषण जाधव यांची सुटका करण्याबाबत आंतरराष्ट्रीय न्यायालय आदेश देऊ शकत नाही. अर्थात, न्यायालयीन प्रक्रियेचं पालन करून त्यांना पुन्हा खटला चालवावा लागेल. त्यात कुलभूषण जाधव यांना वकील द्यावा लागेल. ही बाब निश्चितच महत्त्वाची आहे, असं उज्ज्वल निकम यांनी नमूद केलं. या कार्यवाहीत पाकिस्तानकडून टाळाटाळ झाल्यास संयुक्त राष्ट्र सुरक्षा समिती त्यांना कायदेशीर प्रक्रियेसाठी भाग पाडू शकते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.   



 

पाकिस्ताननं व्हिएन्ना करारातील अटींचं सपशेल उल्लंघन केल्याचं निरीक्षण आंतरराष्ट्रीय न्यायालयानं नोंदवलं आहे. कुलभूषण जाधव यांची फाशीच्या शिक्षेतून सुटका झाली आहे हे नक्की. परंतु, तेवढ्यावरच भारतानं समाधान मानून उपयोगाचे नाही, याकडेही उज्ज्वल निकम यांनी लक्ष वेधलं. पाकिस्तान कुरापती करण्यात चलाख आहे. त्यामुळे तो कुलभूषण यांना पूर्ण बचावाची संधी देईल का, याबद्दल शंका आहे. याआधीही, कुलभूषण जाधव यांचं वकीलपत्र घेण्यास कुठलाही वकील तयार झाला नव्हता. अशा परिस्थितीत, त्यांना पूर्ण न्याय मिळेल, याची खात्री करूनच पावलं टाकणं गरजेचं आहे. २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणी हाफिज सईदविरोधात पुरावे देऊनही पाकिस्तान त्याच्यावर कारवाई करत नाही. यातून त्यांचा ढोंगीपणा सहज लक्षात येतो. त्यामुळे हे यश मोठं असलं तरी त्याने हुरळून जाऊ नये, असं ते म्हणाले. 





 

Web Title: Kulbhushan Jadhav Verdict in ICJ: Big Victory for India, but Kulbhushan could not come back immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.