Kerala Floods : आता आव्हान लाखो लोकांच्या पुनर्वसनाचे; रोगराई रोखण्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:05 AM2018-08-21T00:05:29+5:302018-08-21T07:05:28+5:30

१० लाखांहून अधिक निवारा शिबिरात; ३७५ हून अधिक बळी

Kerala floods: challenge now to rehabilitate millions of people; Stop the disease | Kerala Floods : आता आव्हान लाखो लोकांच्या पुनर्वसनाचे; रोगराई रोखण्याचे

Kerala Floods : आता आव्हान लाखो लोकांच्या पुनर्वसनाचे; रोगराई रोखण्याचे

googlenewsNext

तिरुवनंतपुरम : गेल्या बारा दिवसांपासून सातत्याने कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर कमी झाल्याने केरळला दिलासा मिळाला आहे. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे १० लाखांहून अधिक बेघर लोक निवारा शिबिरांत आहेत. त्यांचे पुनर्वसन करण्याचे मोठे आव्हान आता सरकारपुढे आहे. पूर ओसरल्यानंतर रोगराईवर नियंत्रण राखण्यासाठीही तातडीने पावले उचलावी लागतील.या पावसाने ३७५ हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे.

पूर ओसरल्यानंतर अनेक ठिकाणी माणसे व जनावरांचे मृतदेह सापडत असून, त्यांची विल्हेवाट लावण्याचे काम सुरु आहे. रोगराई टाळण्यासाठी सफाई सुरु केली आहे. सर्व शाळा व महाविद्यालये २९ आॅगस्टपर्यंत बंद ठेवली जाणार आहेत. अनेक शाळा व महाविद्यालयांतच निवारा शिबिरे सुरू आहेत. लोक घरी जाईपर्यंत त्या बंदच ठेवाव्या लागतील.

देशभरातून मदतीचा ओघ सुरू असून, मुंबईहून आयएनएस दीपक जहाजातून पिण्याचे पाणी व १८ टन अन्नधान्य कोची पोहचले. कोची नौदलाचा हवाई तळ प्रवासी वाहतुकीसाठी खुला केला आहे. विमानतळाच्या धावपट्टीवरच पाणी शिरल्याने तो बंदच आहे. सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशही पूरग्रस्तांना मदत करणार आहेत, असे सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांनी सांगितले. अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी याआधीच १ कोटी पूरग्रस्तांसाठी दिले आहेत. केरळमध्ये पुरामुळे विजेचे खांबच वाहून गेल्याने घरे अंधारात आहेत. त्यामुळे केरळला आता कपडे, अन्नधान्याची नव्हे तर हजारो इलेक्ट्रिशियन, प्लंबर, सुतार यांची गरज असून या व्यावसायिकांनी स्वयंसेवी वृत्तीने केरळ यावे, असे आवाहन राज्याचे पर्यटनमंत्री ए. सी. मोईद्दिन यांनी केले आहे. 

मुलीची मदत : तामिळनाडूतील विल्लुपुरमच्या अनुप्रिया या ९ वर्षीय मुलीने सायकलीसाठी गेली चार वर्षे जमविलेले नऊ हजार रुपये केरळच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिले आहेत. हे वृत्त कळताच, एका सायकल कंपनीने तिला सायकल भेट देण्याचे ठरविले आहे. अमेरिकेतील सेवा इंटरनॅशनल संस्थेने पूरग्रस्तांसाठी १० हजार डॉलर्स जमा केले असून, १ लाख डॉलर्स निधी उभारण्याचा निर्धार केला आहे.

केरळमधील काही लाख लोक परदेशांत, विशेषत: आखाती देशांत नोकरी करतात. त्यांनी तिथे पै-पै वाचवून आपल्या गावी उत्तम व पक्की घरे बांधली. पण पावसाने तीही उद्ध्वस्त झाली आहेत. घरांतील सामान वाहून गेले आहे, तर लाखो घरांत अद्याप वीज नाही, पिण्याचे पाणी नाही आणि पाण्याबरोबच घरात इतकी घाण शिरली आहे, की ती स्वच्छ करण्यास बराच कालावधी जाईल. लोकांना घरी जाण्याची इच्छा असली तरी ती सध्या तरी राहण्यायोग्य राहिलेली नाहीत.

निराशेने आत्महत्या
पुराच्या पाण्यामुळे आपली इयत्ता १२ वीची प्रमाणपत्रे पूर्णपणे खराब झाल्याचे दु:ख सहन न होऊन कोळिकोड जिल्ह्यातील कारनतूर गावच्या कैलाश नावाच्या १९ वर्षीय विद्यार्थ्यांने आत्महत्या केली. त्याच्या घरात पुराचे पाणी शिरले होते.

कर्नाटकात लोक बेघर
केरळप्रमाणेच पावसाचा तडाखा कर्नाटकातील कोडगू जिल्ह्यालाही बसला असून तिथे आठ बळी गेले आहेत, तर ४ हजारांपेक्षा जास्त लोक बेघर झाले आहेत. त्यांच्यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या यंत्रणांनी मदतकार्य हाती घेतले आहे. कोडगू जिल्ह्यात काही ठिकाणी दरडी कोसळल्या असून त्यामुळे शेकडो लोक अडकून पडले आहेत. पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून ८००पेक्षा जास्त घरे कोसळली आहेत.

Web Title: Kerala floods: challenge now to rehabilitate millions of people; Stop the disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.