In Kashmir, the life expectancy of the terrorists decreased, in the last two years, 360 terrorists were killed | काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे आयुर्मान घटले, दोन वर्षांत 360 दहशतवाद्यांचा खात्मा 
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे आयुर्मान घटले, दोन वर्षांत 360 दहशतवाद्यांचा खात्मा 

नवी दिल्ली -  भारतीय लष्कराने राबवलेल्या आक्रमक मोहिमांमुळे काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याच्या मार्गावर आहे. लष्कराच्या आक्रमक पवित्र्यामुळे खोऱ्यातील दहशतवाद्यांचे  आयुर्मान घटले असून, गेल्या दोन वर्षांत सुमारे 360 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सीआरपीएफचे डायरेक्टर जनरल राजीव राज भटनागर यांनी एका मुलाखतीमध्ये ही माहिती दिली. 

काश्मीर खोऱ्यातील तरुणांचे दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होण्याचे प्रमाण हे चिंतेचा विषय आहे का, असे विचारले असता उत्तरदाखल भटनागर म्हणाले की, दहशतवादी संघटनांमध्ये भरती होणाऱ्या तरुणांचे वय कमी आहे. मात्र ते फार काळ जगू शकत नाहीत. त्यांची संख्या जास्त असू शकते पण त्यांचा परिणाम मर्यादित आहे. काश्मीर खोऱ्यात दहशतवादी संघटनांध्ये भरती होणाऱ्या तरुणांची संख्या वाढली आहे. मात्र सुरक्षा दलांकडून अशा तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांमध्ये काही बाहेरच्या दहशतवाद्यांचा तर काही स्थानिक तरुणांचा समावेश आहे." 

राज्यातील सीआरपीएफचे जवान, राज्य पोलीस आणि लष्कर एकमेकांशी ताळमेळ ठेवून काश्मीरमध्ये काम करत असल्याचेही भटनागर यांनी यावेळी सांगितले. " आम्ही एक युनिट म्हणून काम करत आहोत. त्यामुळे आम्हाला चांगले यश मिळत आहे. यावर्षी आतापर्यंत 142 दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश आले आहे. तर गतवर्षी 220 दहशतवादी मारले गेले होते." असे ते म्हणाले. काश्मीरमध्ये तैनात जवानांच्या सुरक्षेसाठी फूल बॉडी प्रोटेक्टर, बुलेट प्रूफ गाड्या आणि विशेष चिलखती वाहने तैनात करून जवानांच्या सुरक्षेचा स्तर वाढवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.  


Web Title: In Kashmir, the life expectancy of the terrorists decreased, in the last two years, 360 terrorists were killed
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.