औरंगाबाद, दि. 13 : ‘ महात्मा गाधी, लोकमान्य तिलक, मौलाना आझाद, वल्लभभाई पटेल,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी इन्होंने ये देश बांधा है. देश के लिए इन्होने कुर्बानी दी है. क्या अब हम इतने कमजोर हुए है?, क्या हमारा काँग्रेस पर का भरोसा उठ गया है?, एकही हारसे हम बिथर गये.... जो डर गया वो मर गया’ असा गंभीर इशारा आज येथे काँग्रसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी दिला. 

इंदिरा गांधी जन्मशताब्दी शुभारंभ सोहळ्याचे उद्घाटन करताना ते बोलत होते. श्रीहरी पॅव्हेलिन, शहानूर मियां दर्गाजवळ येथे यानिमित्त काँग्रेसजनांची मोठी गर्दी झाली होती. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण हे अध्यक्षस्थानी होते. 

जन्मापासून ते मृत्युपर्यंतचा सारा इतिहास संघर्षमय 

 आझाद यांनी इंदिरा गांधी यांचा  संघर्षमय जीवनपट  चलचित्रपटाप्रमाणे उपस्थितांच्या समोर उपस्थित केला. जन्मापासून ते मृत्युपर्यंतचा इंदिराजींचा सारा इतिहास संघर्षमय आहे, हे सांगताना त्यांनी नमूद केले की,  वयाच्या ३२ व्या वर्षी मला इंदिराजींच्या मंत्रमंडळात काम करण्याची संधी मिळाली. १९८० च्या लोकसभा निवडणुकीत इंदिराजींनी मला महाराष्ट्रातून वाशीममधून लढण्याची संधी दिली आणि मी त्यावेळी अडीच लाख मतांनी निवडून आलो होतो. नंतरही मी महाराष्ट्रातूनच राज्यसभेवर निवडून गेलो होतो. इंदिराजींमुळे माझे महाराष्टÑाशी नाते जुळले.इथल्या लोकांचा विरोध असतानाही  नंतर मला जम्मू काश्मिरच्या राजकारणात जावे लागले.

दुपारी २-४० च्या सुमारास हा सोहळा सुरु झाला. इंदिराजींच्या प्रतिमेस अभिवादन करुन व दीप प्रज्वलित करुन पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर इंदिरा गांधी यांच्या जीवनावरची १५ मिनिटांची चित्रफित दाखवण्यात आली. सर्व पाहुण्यांचे स्वागत गुलाब पुष्पांच्या एकाच हारात करण्यात आले. मंचावर इंदिरा गांधी यांच्या भव्य प्रतिमा सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. ‘ जब तक सूरज चाँद रहेगा... इंदिरा का नाम रहेगा’ अशा घोषणांचा गजरही यावेळी करण्यात आला. तत्पूर्वी गोरखपूरमध्ये आॅक्सिजनअभाारी दगावलेल्या बालकांना दोन मिटिने उभे राहून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. 

आम्ही गांधीजींना मानणारे.... 

 त्यांनी आम्हाला अहिंसेवर चालायला शिकवले. म्हणूनच अन्याय- अत्याचार मुळीच सहन करणार नाही, असा इशाराही गुलाम नबी आझाद यांनी यावेळी दिला. तत्कालिन जनता पक्षाच्या सरकारने इंदिरा गांधी यांचा शहा कमिशनच्या माध्यमातून कसा छळ केला याची उदाहरणेही आझाद यांनी दिली. 

 गांधी टोपी आणि काळी टोपी यांच्यातला हा संघर्ष .... 

 या सोहळ्यात महाराष्टचे प्रभारी मोहन प्रकाश यांचे जोषपूर्ण भाषण झाले. भाषणाच्या शेवटी त्यांनी, काँग्रेस जिंदाबाद, इंदिरा गांधी जिंदाबाद, सोनीया गांधी जिंदाबादच्या घोषणा वदवून घेतल्या. ‘गांधीजींची टोपी ही स्वातंत्र्याची निशाणी आहे. आरएसएसची टोपी काळी आहे. गांधी टोपी आणि काळी टोपी यांच्यात सध्या संघर्ष सुरु आहे.शामाप्रसाद मुखर्जी हा भाजपवाल्यांचा वारसा आहे. मोहन भागवत हा यांचा रिंगमास्टर आहे.आज यांच्यामुळे देशातला सारा दलित, अल्पसंख्य, शेतकरी, बेरोजगार युवक आणि उद्योजकसुध्दा त्रस्त बनला आहे. तो असुरक्षित होत चालला आहे,  असे ते म्हणाले.त्यांनी आरोप केला की, सध्या देशावर काळ्या इंग्रजांचे राज्य चालू आहे. ते लुटण्यासाठीच आले आहेत. 

प्रारंभी, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार व शहराध्यक्ष नामेदवराव पवार यांनी प्रास्ताविक केले. हा सोहळा घेण्याचा पहिला मान औरंगाबादला दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. ‘ एक जीतसे कोई सिकंदर नहीं बनता और एक हारसे कोई फकिर नहीं बनता’ अशा भावना त्यांनी सध्याच्या परिस्थितीवरुन व्यक्त केल्या. विधान परिषदेतील उपसभापती माणिकराव ठाकरे व ज्येष्ठ पत्रकार सुरेश व्दादशीवार यांचीही यावेळी भाषणे झाली. शेवटी आमदार सुभाष झांबड यांनी आभार मानले. 

भाजपला चले जाव  म्हणण्याची वेळ.. 

यावेळी बोलताना  अशोक चव्हाण म्हणाले, नुकताच ९ आॅगस्ट क्रांती दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी इंग्रजांना चले जाव म्हणावे लागले होते. आता भाजपला चले जाव म्हणण्याची वेळ आली आहे. आज इंदिराजींना बदनाम करण्याचा प्रयत्न चित्रपटाच्या माध्यमातूनसुध्दा होत आहे. पण तो चित्रपट पहायला कुत्रंही गेलं नाही. आरएसएसतर्फे या देशाचा सर्वधर्मसमभावचा व अखंडत्वाचा पायाच उखडून टाकण्याचा प्रयत्न होत आहे. जो सरकारविरोधी तो देशद्रोही ठरवला जात आहे. याविरुध्द ब्रिटीशांच्या विरोधात छेडले गेले होते, त्यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडावे लागेल. आणि या आंदोलनात मराठवाडा अग्रेसरच राहील. व या सरकारला त्याची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही.