जेडीयूचा बाण अखेर नीतीश कुमारांच्याच भात्यात, निवडणूक आयोगाचा शरद यादवांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 05:02 PM2017-11-17T17:02:53+5:302017-11-17T17:13:19+5:30

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि शरद यादवांमध्ये संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या वादात अखेर नितीश कुमार यांची सरशी झाली आहे.

JD (U) 's arrow hits Nitish Kumar, Sharad Yadav of Election Commission | जेडीयूचा बाण अखेर नीतीश कुमारांच्याच भात्यात, निवडणूक आयोगाचा शरद यादवांना धक्का

जेडीयूचा बाण अखेर नीतीश कुमारांच्याच भात्यात, निवडणूक आयोगाचा शरद यादवांना धक्का

Next

पाटणा - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि शरद यादवांमध्ये संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या वादात अखेर नितीश कुमार यांची सरशी झाली आहे. निवडणूक आयोगाने संयुक्त जनता दलाच्या निवडणूक चिन्हावरून सुरू झालेल्या वादावर निकाल देताना नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील गटाला बाण हे चिन्ह दिले आहे. त्याबरोबर छोटूभाई अमरसंग वसावा यांनी आपल्याच गटाला खरा संयुक्त जनता दल पक्ष म्हणून मान्यता द्यावी म्हणून दाखल केलेली याचिकाही निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे नितीश कुमार यांच्यासमोर आव्हान उभे करणाऱ्या शरद यादव यांना धक्का बसला आहे. 
 बिहारमधील महाआघाडी तुटल्यानंतर शरद यादव आणि नितीश कुमार यांच्यामध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले होते. नितीश कुमार यांनी भाजपासोबत आघाडी करण्याच्या घेतलेल्या निर्णयास शरद यादव यांनी विरोध केला होता. त्यातून संयुक्त जनता दलामध्ये दोन गट पडले होते. तसेच दोन्ही गटांनी पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेल्या बाणावर आपला दावा केला होता.  मात्र संयुक्त जनता दलाचे बहुसंख्य आमदार आणि खासदार नितीश कुमार यांच्यासोबत होते.  
आता आगामी गुजरात निवडणुकीत संयुक्त जनता दल आपल्या परंपरागत चार ते पाच मतदार संघांमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार आहे. याबाबत जेडीयूचे प्रवक्ते के.सी. त्यागी यांनी सांगितले की, राज्यसभा सदस्य वगळता सर्व आमदार आणि खासदारांनी नितीश कुमार यांना पाठिंबा दिला. तसेच यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे शपथपत्रही सादर करण्यात आले होते. 
गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांच्या गटाने सोमवारी निवडणूक आयोगाची भेट घेऊन निवडणूक चिन्हावर लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली होती. गुजरात निवडणुकीत आम्हाला निवडणूक चिन्हाचा वापर करता येऊ नये, यासाठी शरद यादव यांचा गट हा वाद लांबवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप नितीश कुमार गटाने केला होता.  
 

Web Title: JD (U) 's arrow hits Nitish Kumar, Sharad Yadav of Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.