ठळक मुद्देजपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचा 'जय जपान, जय इंडिया'चा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृष्टी असलेले नेते- शिंजो आबे10 वर्षांपूर्वी भारताच्या संसदेला संबोधित करण्याची संधी मिळाली होती - शिंजो आबे

अहमदाबाद, दि. 14 - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी गुरुवारी (14 सप्टेंबर) बहुचर्चित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन केले. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी यावेळी आपल्या भाषणाने सर्वांची मनं जिकलं. उपस्थितांना नमस्कार करत शिंजो आबे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. यावेळी आबे यांनी 'जय जपान, जय इंडिया'चा नारा दिला व भविष्यातही भारताला मदत करण्याचं आश्वासन दिले.   
 
नमस्काराने भाषणाची सुरुवात, धन्यवादानं शेवट 

शिंजो आबे यांनी नमस्कार म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात केली. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा गडगडाट केला.  दोन्ही देशांतील मैत्रीची ही नवीन सुरुवात आहे. जपानचे 100 हून अधिक इंजिनिअर या प्रकल्पासाठी भारतात आलेत. या प्रकल्पावर त्यांचे कार्य सुरू आहे. मोदींचं बुलेट ट्रेनचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जपान आणि भारताचे इंजिनिअर दिवस-रात्र मेहनत करतील. या इंजिनिअर्संनी निश्चय केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही,

'जय जपान, जय इंडिया'चा नारा
आबे यांनी भारत आणि जपानच्या मैत्रीला एक उत्तम उदाहरण सांगत एक नवीन नारा देखील दिला. ते म्हणाले की, जपानचा 'ज' आणि इंडियाचा 'आय' हे  अक्षरं मिळून जय शब्द तयार होते म्हणजे विजय होते.  'जय जपान, जय इंडिया'ला साकार करण्यासाठी दोन्ही एकत्र मिळून काम करतील 

'पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृष्टी असलेले नेते' 
आपल्या भाषणामध्ये शिंजो आबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही भरभरुन कौतुक केले. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत', अशा शब्दांत शिंजो आबे यांनी मोदींचं कौतुक केले. '10 वर्षांपूर्वी मला भारताच्या संसदेला संबोधित करण्याची संधी मिळाली होती. जपान आणि भारताचे संबंध म्हणजे हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागराचा संगम आहेत. माझे मित्र पंतप्रधान मोदी हे दूरदृष्टी असलेले नेते असून बुलेट ट्रेनचे स्वप्न करण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली आहे,’ असेही आबे म्हणालेत.   

'जपानमधील बुलेट ट्रेन सेवा सुरक्षित'  
जपानमधील बुलेट ट्रेन सेवा अतिशय सुरक्षित आहे. ही सेवा सुरु झाल्यापासून अद्यापपर्यंत एकही अपघात झालेला नाही, असेही आबे यावेळी म्हणालेत. 'शक्तीशाली भारत जपानच्या पाठिशी असून शक्तीशाली जपानदेखील भारताच्या पाठिशी आहे' असे म्हणत पुढील वेळी मोदींसोबत बुलेट ट्रेनमधून येईन, असेही आबे म्हणाले.

जाणून घेऊया मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची वैशिष्ट्यं
1 . बहुचर्चित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची किंमत 1 लाख 8 हजार कोटी रुपये आहे.   या बुलेट ट्रेनसाठी जपाननं 88 हजार कोटीचं कर्ज दिलं आहे. हे कर्ज 0.1% व्याज दराने मिळणार आहे. 50 वर्षात हे कर्ज फेडावे लागणार आहे. 

2.  या प्रकल्पांतर्गत काही ट्रेन जपानहून येणार आहेत तर काही ट्रेन्सची निर्मिती भारतातच केली जाणार आहे.   

3. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे मेक इन इंडिया योजनेची ताकद वाढण्यास मदत होईल. 

4.  तंत्रज्ञान तसेच औद्योगिक क्षेत्राचाही यानिमित्तानं विकास होण्यास मदत होईल 

5. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे 24 हजार रोजगार निर्माण होणार असल्याचे म्हटले जाते आहे. 

6.  1 लाख 8 हजार कोटीं रुपयांच्या या महत्त्वकांक्षी प्रकल्प मुंबई ते अहमदाबादचे 508 किलोमीटरचे अंतर ताशी 350 कि.मी. वेगाने पूर्ण होईल. महाराष्ट्रातील 156 कि.मी., गुजरातमधील 351 कि.मी. या टप्प्यातून ही ट्रेन धावणार आहे. 

7.  वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रवास सुरू होणार असून ते पुढे ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिल्लीमोरा, सुरत, भरुच, बडोदा, आनंद, अहमदाबाद, साबरमती असे 12 स्टेशन असतील. 

8. या प्रकल्पासाठी 700 हेक्टरहून अधिक जमीन संपादित करण्यात येणार असून, ठाणे-वाशी भागातून 7 किमी समुद्राखालून ही ट्रेन धावणार आहे. याशिवाय ही रेल्वे मुंबईतून 15 किमी भूमिगत मार्गाने जाणार आहे. 

9. अहमदाबाद-मुंबई अंतर रेल्वेनं पार करण्यासाठी सध्या 7 ते 8 तास लागतात. मात्र बुलेट ट्रेनमुळे हे केवळ तीन तासांत हे अंतर पार करता येणार आहे.  

10. बडोदा शहराजवळ ही रेल्वे ४५ डिग्रीचे वळण घेणार आहे.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.