नवी दिल्ली - अभिनयानंतर आता राजकारणात प्रवेश करत असलेल्या  कमल हासन यांनी ‘हिंदू दहशतवादा’वरून नवा वाद छेडला आहे.  भा.द.वी. कलम 500, 511, 298,295(अ) आणि 505(क) नुसार कमल हासन यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हिंदू शिबिरांमध्ये आता दहशतवाद घुसला असल्याची टीका त्यांनी तामिळ साप्ताहिक ‘आनंदा विकटन’मध्ये लिहिलेल्या लेखातून केली. 

नेमकं काय आहे लेखात -

हिंदू दहशतवादावर भाष्य करणारा लेख लिहून कमल हासन यांनी खळबळ उडवून दिली आहे. 'उजव्या विचारसरणीच्या लोकांनी बळाचा वापर करायला सुरुवात केली आहे. हे लोक हिंसाचारात सहभागी असून हिंदुत्ववादी संघटनांमध्ये दहशतवाद घुसला आहे', असा आरोप कमल हासन यांनी त्यांच्या लेखातून केला आहे. 'हिंदू दहशतवाद अस्तित्वात नाही, असं कोणीच म्हणणार नाही. यापूर्वी हिंदुत्ववादी चर्चा करण्यावर विश्वास ठेवायचे. पण आता ते हिंसाचारातही सहभागी होऊ लागले आहेत', असं कमल हासन यांनी म्हंटलं आहे. तसंच जनतेचा 'सत्यमेव जयते'वरील विश्वास उडाला आहे, असंही त्यांनी लेखात म्हंटलं आहे. 'तामिळनाडूच्या तुलनेत केरळ सरकारने धार्मिक हिंसाचार चांगल्या पद्धतीनं हाताळला आहे', असं म्हणत कमल हासन त्यांनी केरळ सरकारचं कौतुकही केलं आहे.

कमल हासन मानसिकदृष्टया अस्थिर, उपचारांची गरज- भाजपानं केली टीका

कमल हासन यांचे विधान भाजपा नेत्यांच्या जिव्हारी लागले आहे. त्यांनी अत्यंत बोच-या शब्दात कमल हासन यांच्यावर टीका केली आहे. कमल हासन यांची मनोवस्था ठीक नसून, ते मानसिक दृष्टया अस्थिर झाले आहेत अशा शब्दात भाजपा नेत्यांनी कमल हासन यांच्यावर हल्लाबोल केला आहे. कमल हासन यांनी आपल्या विधानाबद्दल माफी मागितली पाहिजे. त्यांची मनोवस्था ठीक नसून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्याची गरज आहे असे भाजपा नेते विनय कटियार म्हणाले. अशा प्रकारचे एखाद्याची बदनामी करणारे राजकारण करणे अजिबात योग्य नाही. त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाहीय असे कटियार यांनी सांगितले.  


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.