ठळक मुद्देनिती आयोगने 2022 मध्ये नवा भारत पहायला मिळेल असा दावा केला आहे'2022 सालापर्यंत भारतातून गरिबी, भ्रष्टाचार, अस्वच्छता, दहशतवाद जातीवाद आणि सांप्रदायिकता हद्दपार झालेलं असेल''भारताचा प्रगती स्तर आठ टक्के कायम राहिला तर 2047 पर्यंत जगातील पहिल्या तीन इकॉनॉमीमध्ये भारताचा समावेश '

नवी दिल्ली - सरकारची थिंक टँक समजल्या जाणा-या निती आयोगने 2022 मध्ये नवा भारत पहायला मिळेल असा दावा केला आहे. निती आयोगने केलेल्या दाव्यानुसार, 2022 सालापर्यंत भारतातून गरिबी, भ्रष्टाचार, अस्वच्छता, दहशतवाद जातीवाद आणि सांप्रदायिकता हद्दपार झालेलं असेल. निती आयोगचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी गेल्या महिन्यात कॉन्फरन्स ऑफ गव्हर्नर्समध्ये सादर केलेल्या न्यू इंडिया @2022 डॉक्युमेंटमध्ये ही माहिती दिली आहे. भारताचा प्रगती स्तर आठ टक्के कायम राहिला तर 2047 पर्यंत जगातील पहिल्या तीन इकॉनॉमीमध्ये भारताचा समावेश असेल असा अंदाजही राजीव कुमार यांनी लावला आहे. 

2022 मध्ये भारत कुपोषणमुक्त असेल असाही अंदाज राजीव कुमार यांनी आपल्या डॉक्युमेंटमधून केला आहे. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, 2019 पर्यंत भारतात सरकार प्रधानमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक गावाशी जोडले जाण्यात सक्षम होईल. याशिवाय 2022 पर्यंत भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 20 उच्च शिक्षण संस्था असतील असंही सांगण्यात आलं आहे. 

प्रधानमंत्री आदर्श गाव योजनेअंतर्गत सर्व गावांना 'माडेल विलेज'चा दर्जा देण्यात येईल असंही रिपोर्टमधून सांगण्यात आलं आहे. 2022 पर्यत भारत गरिबीचा प्रश्न सोडवण्यात यशस्वी होईल असा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.