सिक्कीम-अरुणाचलच्या सीमेवर भारतानं वाढवलं सैन्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2017 10:18 PM2017-08-11T22:18:09+5:302017-08-11T22:18:19+5:30

सतर्कतेचं पाऊल उचलत भारतानंही अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या सीमेवर जवानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली आहे.

India enhanced army on Sikkim-Arunachal border | सिक्कीम-अरुणाचलच्या सीमेवर भारतानं वाढवलं सैन्य

सिक्कीम-अरुणाचलच्या सीमेवर भारतानं वाढवलं सैन्य

Next

नवी दिल्ली, दि. 11 - डोकलाम वादावरून चीनसोबत गेल्या दोन महिन्यांपासून भारताचा वाद सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर सतर्कतेचं पाऊल उचलत भारतानंही अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या सीमेवर जवानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. लष्कराच्या वरिष्ठ अधिका-यांनी याची माहिती दिली आहे. अधिकारी म्हणाला, सीमेवर तैनात असलेल्या जवानांना सावधानतेचा इशादा देण्यात आला आहे. डोकलाम मुद्द्यावरून चीननं घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. चीन-भारतादरम्यानच्या सिक्कीमपासून अरुणाचल प्रदेश एवढ्या 1400 किलोमीटरच्या लांबच्या अंतरावर मोठ्या प्रमाणात सैनिक तैनात करण्यात आले आहेत.  
भारताशी तडजोडीची भूमिका स्वीकारण्यात येत असून, चिनी सैन्य मागे घेण्यात येईल या निव्वळ अफवा असल्याचा खुलासा काही तासांपूर्वीच चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला होता. चीन आपले सैन्य 100 मीटरपर्यंत मागे घेण्यास राजी झाल्याचे वृत्त अत्यंत चुकीचे असल्याचे चीनच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले होते. चीन 100 मीटर मागे हटण्यास तयार असून भारताने मात्र चिनी सैन्य 250 मीटर मागे न्यावे, अशी मागणी केल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले होते. 
चायना डेलीने दिलेल्या वृत्तानुसार हे वृत्त निराधार असून चीन आपल्या प्रादेशिक हक्कांविषयी कधीही तडजोड करणार नाही अशी प्रतिक्रिया देण्यात आली होती. या संदर्भातली चीनची भूमिका अत्यंत स्पष्ट आणि ठाम असल्याचा दावा या प्रवक्त्याने केला होता. भारताने विनाअट आपले या भागात आणलेले सैन्य मागे घ्यावे अशी मागणीही चिनी प्रवक्त्याने चायना डेलीशी बोलताना केली होती.

चीन भारताच्या अवास्तव मागण्या कधीही मान्य करणार नाही, अशी दर्पोक्तीही करण्यात आली होती. भारतानेच चीनच्या हद्दीत घुसखोरी केल्याचा दावा चिनी परराष्ट्र खात्याने केला आहे. चीनने या संदर्भात भूतानच्या स्वातंत्र्याबद्दल तसेच प्रादेशिक हक्काबाबतही प्रश्न उपस्थित केला होता. मात्र भूतानने चीनचा दावा खोडताना भारताच्या दाव्याशी अनुकूल मत व्यक्त केले होते. चीन रस्त्याचे करत असलेले काम हे भूतानच्या हद्दीत असून ते चीनने भूतानशी केलेल्या कराराच्या विपरीत असल्याची भूमिका भारताने मांडली आहे. तसेच, या रस्त्यामुळे या भागातल्या सुरक्षा व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याचेही भारताने म्हटले होते. 

दोन्ही देशांनी सैन्य मागे घ्यावे आणि चर्चा करावी अशी भारताची भूमिका असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. जूनमध्ये हा पेचप्रसंग निर्माण झाला असून भारत व चीनचे सैन्य सिक्कीम, भूतान व चीन या तिघांचा संगम होत असलेल्या डोकलाम भागात समोरासमोर ठाकले आहे.

Web Title: India enhanced army on Sikkim-Arunachal border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.