गर्भवती महिलेला दिलं HIV संक्रमित रक्त, ब्लड बँकेचे 3 कर्मचारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 01:42 PM2018-12-26T13:42:48+5:302018-12-26T13:46:12+5:30

तामिळनाडूमध्ये गर्भवती महिलेला HIV संक्रमित रक्त चढवल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

hiv positive blood injected to pregnant women in tamilnadu | गर्भवती महिलेला दिलं HIV संक्रमित रक्त, ब्लड बँकेचे 3 कर्मचारी निलंबित

गर्भवती महिलेला दिलं HIV संक्रमित रक्त, ब्लड बँकेचे 3 कर्मचारी निलंबित

ठळक मुद्देतामिळनाडूमध्ये गर्भवती महिलेला HIV संक्रमित रक्त चढवल्यानं एकच खळबळ उडाली आहे. तामिळनाडूतल्या शिवकाशीतल्या सत्तुर सरकारी रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या 24 वर्षीय गर्भवती महिलेला HIV संक्रमित रक्त चढवण्यात आलं.

चेन्नई- तामिळनाडूमध्ये गर्भवती महिलेला HIV संक्रमित रक्त चढवल्यानं एकच खळबळ उडाली आहे. तामिळनाडूतल्या शिवकाशीतल्या सत्तुर सरकारी रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या 24 वर्षीय गर्भवती महिलेला HIV संक्रमित रक्त चढवण्यात आलं. जेव्हा महिला वारंवार आजारी पडू लागली, तेव्हा ही घटना उघडकीस आली. ही घटना उघडकीस आल्यानंतर रुग्णालय प्रशासन खडबडून जागे झाले असून, त्यांनी ब्लड बँकेच्या तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित केलं आहे.

30 नोव्हेंबर रोजी HIV संक्रमित व्यक्तीचं रक्त घेण्यात आलं होतं. त्यानं परदेशात जाण्यापूर्वी खासगी रुग्णालयातून रक्ताची चाचणी केली होती. ज्यात तो HIV संक्रमित असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्यानं पुन्हा शिवकाशीतल्या सरकारी रुग्णालयात रक्ताची तपासणी केली, त्यावेळीही तो एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळला. त्याच्या काही दिवसांनंतर 3 डिसेंबरला एक गर्भवती महिलेला अॅनिमिया झाल्यानं उपचारासाठी तिला शिवकाशीतल्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्या महिलेची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी तिला रक्त चढवण्याचा सल्ला दिला. त्यावेळीच तिला HIV संक्रमित रक्त चढवण्यात आलं.

या घटनेच्या काही दिवसांनंतर महिला वारंवार आजारी पडू लागली. जेव्हा तिला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तेव्हा ती एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळली. सध्या महिलेचं समुपदेशन सुरू असून, तिला HIVपासून वाचवण्यासाठी अँटी रेट्रोवायरलवर ठेवण्यात आलं आहे.  या प्रकारानंतर जिल्हा वैद्यकीय उपसंचालक मनोहरन यांनी 10 सरकारी ब्लड बँक आणि 4 खासगी ब्लड बँकेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तर महिलेच्या कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. सध्या तरी तपासणी सुरू असून, अजून कोणाला HIV संक्रमित रक्त चढवण्यात आलं तर नाही ना, याचा रुग्णालय प्रशासन तपास करत आहे. 

Web Title: hiv positive blood injected to pregnant women in tamilnadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.