‘फनी’ चक्रीवादळ सरकले ओडिशाच्या किनारपट्टीकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 03:18 AM2019-05-02T03:18:41+5:302019-05-02T03:19:20+5:30

सतर्कतेचा इशारा : दोन दिवसात पुरीला धडकण्याची शक्यता

'Funny' hurricane slips across the coast of Odisha | ‘फनी’ चक्रीवादळ सरकले ओडिशाच्या किनारपट्टीकडे

‘फनी’ चक्रीवादळ सरकले ओडिशाच्या किनारपट्टीकडे

googlenewsNext

नवी दिल्ली : भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे वेगाने सरकत असलेले फनी चक्रीवादळ येत्या दोन दिवसात ओडिशातील दक्षिण पुरीच्या गोपालपूर आणि चांदबली भागात धडकण्याची शक्यता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) बुधवारी स्पष्ट केली आहे.
अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ताशी २०५ कि.मी. वेगाने तसेच १७५-१८५ कि.मी. ताशी चक्राकार गतीने वारे वाहत असून, शुक्रवारी ३ मे रोजी दक्षिण पुरीच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याची माहिती एनडीएमएने हवामान खात्याच्या बुलेटिनच्या हवाल्याने दिली आहे.

आंध्र प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, जम्मू-काश्मीर तसेच प. बंगाल आणि सिक्कीममधील काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ४० ते ४५ कि.मी. राहण्याची शक्यता आहे. काही स्थानांवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची(एनडीआरएफ)मदत चमू तसेच नौदल आणि तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर्स तैनात असतील.

आपत्ती व्यवस्थापन समितीची तातडीची बैठक
मंत्रिमंडळ सचिव पी. के. सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या पहिल्या बैठकीतील निर्णयाच्या आधारावर व्यवस्थापनाबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने एका निवेदनात दिली आहे. केंद्र सरकारने प्रतिबंधात्मक आणि मदत योजनेंतर्गत तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि प. बंगालसाठी १०८६ कोटींची मदत जारी केली आहे.

पर्यटकांना पुरी सोडून जाण्याचा आदेश
फनी चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता ओडिशा सरकारने पर्यटकांना पुरी सोडून जाण्याचा सल्ला दिला आहे. ओडिशातील संपूर्ण शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात येतील. हवामान विभागाने ओडिशा किनारपट्टी भागात ‘यलो वॉर्निंग’ जारी केल्यानंतर रस्ते आणि रेल्वे वाहतूक स्थगित किंवा वळती करण्याचा पर्याय अवलंबला जाणार आहे. किनारपट्टी भागात मासेमारी थांबविण्यात आली असून, लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याची सूचना करण्यात आली आहे.

एनडीआरएफच्या ४१ चमूंची तैनाती
आंध्र प्रदेश (८), ओडिशा(२८), प. बंगाल (५) अशा ४१ चमू एनडीआरएफ तैनात करणार असून, प. बंगालसाठी १३ तर आंध्र प्रदेशसाठी १० चमू राखीव असतील. एका चमूत ४५ जवान असतील.

Web Title: 'Funny' hurricane slips across the coast of Odisha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.