ठळक मुद्देभोपाळमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी डॉक्टरांचा हलगर्जीपणा समोरज्युनिअर डॉक्टरच्या चुकीमुळे बलात्काराला 'सहमतीने करण्यात आलेला सेक्स' असं मेडिकल रिपोर्टमध्ये लिहिण्यात आलं होतं

भोपाळ - मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी डॉक्टरांचा हलगर्जीपणा समोर आला आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, बलात्कार पीडितेच्या मेडिकल रिपोर्टमध्ये एका ज्युनिअर डॉक्टरच्या चुकीमुळे बलात्काराला 'सहमतीने करण्यात आलेला सेक्स' असं लिहिण्यात आलं होतं. रिपोर्टमध्ये डॉक्टरने लिहिलं होतं की, पीडित तरुणीने सहमतीने दोघांसोबत शारिरीक संबंध ठेवले होते. सुल्तानिया रुग्णालयात हा रिपोर्ट तयार करण्यात आला होता. हे एक सरकारी रुग्णालय आहे. रुग्णालयाच्या प्रमुखांनी, ज्युनिअर डॉक्टरच्या चुकीने हा रिपोर्ट तयार झाला होता, मात्र चूक सुधारण्यात आली आहे अशी माहिती दिली. पोलिसांनी बलात्कार प्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. 

19 वर्षीय तरुणीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. जवळपास तीन तास तरुणीवर बलात्कार होत होता. बलात्कार करणा-या आरोपींनी चहा आणि सिगरेटसाठी ब्रेकही घेतला होता. यानंतर पुन्हा त्यांनी आपला अत्याचार सुरु ठेवला. शहरातील गजबजलेल्या ठिकाणी ब्रिजखाली तरुणीवर बलात्कार होत असताना आजूबाजूने जाणा-या लोकांना आणि वाहनांना साधं हे दिसलंही नसावं याचं आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. महत्वाची आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे पीडित तरुणीचे वडिल पोलीस उपनिरीक्षक आणि आई सीआयडीत असतानाही पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. रेल्वे पोलिसांनी ही एक फिल्मी स्टोरी असल्याचा शेरा करत तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला होता. जेव्हा पीडित तरुणीने स्वत: दोन आरोपींना पकडून पोलिसांसमोर हजर केलं, तेव्हा कुठे पोलिसांनी घटनेची दखल घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी तक्रार दाखल न करत बेजबाबदारपणे वागणा-या 10 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

पीडित तरुणी युपीएससी परिक्षेसाठी तयारी करत होती. यासाठी रोज ती प्रवास करत असे. मंगळवारी संध्याकाळी कोचिंग क्लास संपल्यानंतर हबीबगंज स्थानकाच्या दिशेने ती चालत निघाली होती. अंतर फार नसल्याने ती चालत चालली होती. जवळपास सात वाजण्याच्या सुमारास गोलू बिहारी याने तिचा हात पकडला. तरुणीने लात घालून त्याला खाली पाडलं. यामुळे चिडलेल्या गोलूने आपला मित्र अमर घुंटू याला हाक मारली. दोघांनी तिला फरफटत जवळच्या नाल्याजवळ नेल. यावेळी तरुणी दोघांनाही दगडाने मारण्याचा प्रयत्न करत होती. 

यानंतर दोघा आरोपींनी तरुणीला बांधलं, आणि बलात्कार केला. 15 मिनिटं झाल्यानंतर गोलू बिहारी गुटखा आणि सिगरेट आणण्यासाठी निघून गेला. त्याने अमरला लक्ष ठेवण्यासाठी तिथेच उभं केलं होतं. अमर आणि गोलू एकमेकांचे साडू आहेत. 

पीडित तरुणीने आपले कपडे फाटले असल्याने अंगावर घालण्यासाठी कपडे देण्याची विनंती केली. यावेळी गोलूने काही कपडे आणून दिले. कदाचित त्याने आपल्या बायकोचे कपडे आणले होते. यावेळी अजून दोघांना तो आपल्यासोबत घेऊन आला होता. यानंतर पुन्हा तरुणीवर बलात्कार करण्यात आला. गोलूसोबत आलेल्या राजेश आणि रमेश यांनीही त्यांना साथ दिली. रात्री 10 वाजेपर्यंत हा प्रकार सुरु होता. यानंतर अखेर आरोपींनी पीडित तरुणीला जाण्याची परवानगी दिली. पण त्याआधी मोबाइल फोन, घड्याळ आणि अंगावरील दागिने ठेवून जायला सांगितलं. 

पीडित तरुणीने यानंतर तात्काळ जवळ असणा-या आरपीएफ पोस्टकडे धाव घेतली आणि आपल्या आई-वडिलांना फोन केला. आपल्या मुलीचा शोध घेत फिरत असलेल्या वडिलांनी तिला घरी नेलं. सकाळी तक्रार करण्यासाठी पीडित तरुणी आई-वडिलांसहित एम पी नगर पोलीस ठाण्यात पोहोचले. पण पोलिसांनी त्यांना हबीबगंज पोलीस ठाण्यात जायला सांगितिलं. हबीबगंज पोलिसांनीही तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ करत त्यांना जीआरपीकडे जाण्यास सांगितलं. तिथे पोहोचून घटनेबद्दल सांगितलं असता, अधिका-याने फिल्मी स्टोरी सांगत असल्याचा शेरा केला.

'हबीबगंज येथून येत असताना माझ्या मुलीने दोघा आरोपींना पाहिलं. घटनास्थळापासून 500 मीटर अंतरावर ते होते', अशी माहिती पीडित तरुणीच्या आईने दिली. यानंतर पोलीस, पीडित तरुणी आणि तिच्या आई-वडिलांनी पाठलाग करुन त्यांना पकडलं. दोघा आरोपींना हबीबगंज जीआरपीच्या ताब्यात देण्यात आलं. 
 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.