ठळक मुद्देगतवर्षी येमेनमध्ये दहशतवाद्यांनी अपहरण केलेले ख्रिश्चन धर्मगुरू फादर टॉम उझुन्नलिल यांची दीड वर्षाने सुटका करण्यात आली फादर टॉम उझुन्नलिल यांच्या सुटकेसाठी कोणतीही खंडणी देण्यात आली नव्हती असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं 'परराष्ट्र मंत्रालयाने कोणताही गाजावाजा न करता, शांतपणे आपलं काम पुर्ण केलं आहे', असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं

थिरुअनंतपुरम, दि. 13 - ख्रिश्चन धर्मगुरू फादर टॉम उझुन्नलिल यांच्या सुटकेसाठी कोणतीही खंडणी देण्यात आली नव्हती असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. गतवर्षी येमेनमध्ये दहशतवाद्यांनी अपहरण केलेले ख्रिश्चन धर्मगुरू फादर टॉम उझुन्नलिल यांची दीड वर्षाने सुटका करण्यात आली आहे. केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी ट्विटरवरून ही माहिती दिली. 'परराष्ट्र मंत्रालयाने कोणताही गाजावाजा न करता, शांतपणे आपलं काम पुर्ण केलं आहे', असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. 

फादर टॉम उझुन्नलिल हे मूळ केरळचे असून, ख्रिश्चन मिशन-यांकडून चालविण्यात येत असलेल्या वृद्धाश्रमात ते कार्यरत होते. गेल्या वर्षी 6 मार्च 2016 रोजी इसिसच्या दहशतवाद्यांनी येमेनमधील अदेन शहरात हल्ला करून फादर टॉम यांचे अपहरण केले होते. या हल्ल्यात 15 जण ठार झाले होते. 

'फादर टॉम उझुन्नलिल यांच्या सुटकेमुळे परराष्ट्र मंत्रालय अत्यंत शांतपणे कोणताही गाजावाजा न करता काम करत असल्याचं स्पष्ट झालं आहे, आणि सरतेशेवटी आपलं काम पुर्णदेखील करत आहे', असं परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंह यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. यावेळी त्यांना फादर टॉम उझुन्नलिल यांच्या सुटकेसाठी खंडणी द्यावी लागली का ? असा प्रश्न विचारला असता त्यांनी नकार दिला. 

'फादर टॉम उझुन्नलिल यांचं येमेन येथून अपहरण झाल्यानंतर कोणत्या प्रकारची टीका झाली होती हे आजही माझ्या लक्षात आहे. फादर टॉम उझुन्नलिल सुरक्षित परतल्याचा मला आनंद आहे. त्यांना आम्ही सुरक्षित आणू शकलो याचा लोकांना आनंद आहे याची आम्हाला खात्री आहे', असंही व्ही के सिंह यांनी यावेळी बोलताना सांगितलं. 

मे महिन्यात फादर टॉम हे मदतीसाठी याचना करीत असल्याचा एक व्हिडीओ स्थानिक वृतवाहिनीवरून प्रसारित झाला होता. त्यात ते माझी प्रकृती ढासळत असून, तत्काळ उपचाराची गरज असल्याचे सांगत होते. त्यानंतर, केरळ सरकार आणि केंद्र सरकारकडून त्यांच्या सुटकेसाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. अखेर या प्रयत्नाला यश आले असून, त्यांची सुटका करण्यात आली आहे. फादर टॉम यांना मस्कतमध्ये नेण्यात आले असून, त्यांना विमानाने भारतात परत आणले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.