#Flashback2017: 2017 मध्ये घडलेल्या मोठ्या दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 04:36 PM2017-12-26T16:36:57+5:302017-12-26T16:39:50+5:30

जाणून घेऊया 2017मधील मोठ्या दुर्घटनांबद्दल. 

# Flashback2017: Bigger crash that took place in 2017 | #Flashback2017: 2017 मध्ये घडलेल्या मोठ्या दुर्घटना

#Flashback2017: 2017 मध्ये घडलेल्या मोठ्या दुर्घटना

Next

मुंबई- 2017 चा निरोप घेण्यासाठी सगळे सज्ज झाले आहेत. या वर्षातील अनेक गोड आठवणी सोबत घेऊन नवीन वर्षाचं स्वागत करण्याची जोरदार तयारी सुरु झाली आहे. मात्र काही गोड आठवणींसोबत कटू आठवणीदेखील आहेत ज्या विसरता येणं शक्य नाही. 2017 या वर्षात अनेक मोठ्या दुर्घटना घडल्या. या दुर्घटनांमध्ये अनेक निष्पापांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. यावरुन अनेक आरोप - प्रत्यारोपही झाले. जाणून घेऊया अशाच काही 2017मधील मोठ्या दुर्घटनांबद्दल. 

गोरखपूरमधील हॉस्पिटलमध्ये नवजात अर्भकांचा मृत्यू


उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमध्ये असलेल्या बाबा राघव दास मेडिकल कॉलेजमध्ये जवळपास 1 हजारपेक्षा जास्त नवजात अर्भकांचा मृत्यू झाला. ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्याच्या कालावधीत या मुलांचा मृत्यू झाला. गोरखपूरमधील या धक्कादायक घटनेने सगळ्यांचंच लक्ष वेधलं होतं. तसंच यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही झाले. सप्टेंबर महिन्यात लहान मुलांचा मृत्यू होणं ही सामान्य बाब असल्याचं धक्कादायक वक्तव्य उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी केल्याने सगळीकडून संताप व्यक्त केला गेला. 

एनडीपीएल बॉयलर स्फोट


उत्तर प्रदेशच्या रायबरेली येथील एनटीपीसीच्या उंचाहार औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पात 2 नोव्हेंबर रोजी बॉयलरचा भीषण स्फोट झाला. यामध्ये 32 जणांचा मृत्यू झाला.  बॉयलरचा स्टीम पाइपमध्ये ब्लॉकेज असल्याने ही दुर्घटना घडली. ५०० मॅगावॅटच्या वीज निर्मिती केंद्रात हा स्फोट झाला होता. यामध्ये अनेक कामगार जखमीही झाले होते. माध्यमांमध्ये हा मुद्दा उचलून धरल्यावर घटनेची चौकशी करण्यात आली. 

एल्फिन्स्टन चेंगराचेंगरी


29 सप्टेंबर 2017 (शुक्रवार) हा दिवस रेल्वे प्रवाशांसाठी खरोखरचा ब्लॅकफ्रायडे ठरला. पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन स्थानकात अफवा पसरून तुफान चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू आला तर अनेक जण जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. यावरून अनेक वादविवाद झाले अजूनही सुरूच आहेत. एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने 5 लाखांची मदत जाहीर केली. प्रवाशांचा उद्रेक, राजकीय मोर्चे यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं अशी चर्चा सुरू झाली. आता एल्फिन्स्टन स्थानकावरील पूल लष्कराकडून बांधला जातो आहे. 

हिराखंड ट्रेन अपघात


22 जानेवारी रोजी आंध्रप्रदेशमध्ये हिराखंड ट्रेनचे 9 डबे रूळावरून घसरून अपघात झाला. या अपघातात 39 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 36 प्रवासी जखमी झाले. हिराखंड एक्स्प्रेस जगदाळपूरहून भुवनेश्वरला जात असताना हा भीषण अपघात झाला होता. 

उत्कल ट्रेन अपघात


18 ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशच्या मुझ्झफरनगरमध्ये पुरी-हरिद्वार-कलिंगा एक्स्प्रेसचे 14 डबे रूळावरून घसरून अपघात झाला. या अपघातात 23 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 40 जण गंभीर जखमी झाले. अपघातातील मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाख रूपये नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी घोषणा ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केली. तर केंद्रीय रेल्वेमंत्रालयाने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी साडेतीन लाख आणि जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर केली.
 

Web Title: # Flashback2017: Bigger crash that took place in 2017

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.