जम्मू काश्मीर - सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, लपून बसलेत दहशतवादी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 11:47 AM2017-08-22T11:47:22+5:302017-08-22T11:50:31+5:30

दोन ते तीन दहशतवादी लपले असल्याची शक्यता आहे

Encounter underway in Kupwara between Security forces and terrorists | जम्मू काश्मीर - सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, लपून बसलेत दहशतवादी

जम्मू काश्मीर - सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, लपून बसलेत दहशतवादी

googlenewsNext

श्रीनगर, दि. 22 - कुपवाडा जिल्ह्यातील हंडवारा परिसरात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. सकाळपासून ही चकमक सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन ते तीन दहशतवादी लपले असल्याची शक्यता असून त्यांचा शोध घेण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरक्षा जवान करत आहेत. 

काश्मीरमधून दहशतवाद आणि दहशतवाद्यांचं कंबरडं मोडण्यासाठी लष्कराने कंबर कसली असून धडक कारवाई केली जात आहे. ऑगस्ट महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश मिळालं आहे. 9 ऑगस्ट रोजी सुरक्षा जवानांनी पुलवामा जिल्ह्यात कारवाई करत तीन दहशतवाद्यांना ठार केलं होतं. दहशतवादी त्याठिकाणी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा जवानांनी ही कारवाई केली होती. 


7 ऑगस्ट रोजी झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा जवानांना यश मिळालं होतं. तर 3 ऑगस्ट रोजी शोपिअन जिल्ह्यात दोन दहशतवादी ठार झाले होते. यावेळी लष्कराचा एक अधिकारी आणि जवानही शहिद झाले होते. 

जम्मू काश्मीरमध्ये गुप्तचर यंत्रणांकडून मिळत असलेल्या ठोस माहितीच्या आधारे दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत दहशतवादाचं कंबरडं मोडण्यात यश मिळालं आहे. परिस्थिती तर अशी झाली आहे की, या वर्षात जितके दहशतवादी भरती झालेले नाहीत त्यापेक्षा जास्त दहशतवादी ठार करण्यात आले आहेत. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी जम्मू काश्मीरात एकूण 71 दहशतवाद्यांची भरती करण्यात आली होती. मात्र लष्कराने कारवाई करत एकूण 132 दहशतवाद्यांना ठार केलं आहे. 

यावर्षी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून 78 दहशतवाद्यांनी घुसखोरी केली आहे. गतवर्षी 2016 मध्ये हा आकडा एकूण 123 होता. दहशतवाद्यांची ही आकडेवारी पाहता काश्मीर खो-यातील दहशतवाद्यांच्या घुसखोरीचं प्रमाणही कमी झाल्याचंच दिसत आहे. 

यावर्षी लष्कराने कारवाई करत ज्या 132 दहशतवाद्यांना ठार केलं, त्यामधील 74 विदेशी तर 58 स्थानिक दहशतवादी होते. यामधील 14 लष्कर-ए-तोयबा, हिजबूल मुजाहिद्दीन आणि अल-बद्रचे टॉप कमांडर होते. राज्य पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफने केलेल्या संयुक्त कारवायांमध्ये मोठं यश हाती लागत असल्याचं दिसत आहे. 

काश्मीर खो-यातील मुजाहिद्दीनचं कामकाज सांभाळणा-या दहशतवादी बु-हान वानीचा लष्कर जवानांनी गतवर्षी 8 जुलै रोजी खात्मा केला होता. चकमकीत तो ठार मारला गेला होता. यानंतर झाकिर मूसा, सबजार अहमद भट, यासिन यांचाही खात्माही करण्यात आला असून, आतापर्यंतची मोठी कारवाई म्हणून पाहिलं जात आहे.

लष्कराची मोठी कारवाई, सहा महिन्यात 92 दहशतवादी ठार
काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाईला सुरुवात केली असून त्याचा प्रभावही दिसू लागला आहे. यावर्षी 2 जुलैपर्यंत जवानांनी जवळपास 92 दहशतवाद्यांना ठार केलं आहे. 2016 मध्ये जुलैपर्यंतची आकडेवारी पहायला गेल्यास हा आकडा 79 इतका होता. दहशतवादी विरोधी कारवाईत यावर्षी खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा आकडा 2012 आणि 2013 मधील वार्षिक आकडेवारीपेक्षाही जास्त आहे. त्यावेळी युपीए सरकार सत्तेत होतं.

लष्कराला मोठं यश 
जम्मू काश्मीरमध्ये 2012 रोजी 72 तर 2013 मध्ये 67 दहशतवादी ठार करण्यात आले होते. एनडीएच्या कार्यकाळात 2014 मध्ये हा आकडा वाढून 110 वर पोहोचला. 2015 मध्ये एकूण 108, तर 2016 मध्ये 150 दहशतवादी मारले गेले. गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, "यावर्षी 2 जुलैपर्यंत ठार केल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या 2014 आणि 2015 मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या आकड्यापेक्षा थोडी कमी आहे". दहशतवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या या चोख कारवाईचं श्रेय लष्कर, केंद्रीय दलं, राज्य सरकार आणि गुप्तचर यंत्रणांमधील उत्तम समन्वयाचं आहे. यावर्षी 2 जुलैपर्यंत ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये अनेक कुख्यात दहशतवाद्यांचा समावेश आहे. गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितल्यानुसार, "सुरक्षा जवानांना खो-यात लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेऊन, त्यांचा खात्मा करण्यासाठी मोकळीक दिली आहे. 
 

Web Title: Encounter underway in Kupwara between Security forces and terrorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.