Jammu-Kashmir : बारामुल्ला परिसरात जवानांनी घेरलं दहशतवाद्यांना, चकमक सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 08:25 AM2018-02-16T08:25:36+5:302018-02-16T08:39:50+5:30

सीमारेषेवर वारंवार होणा-या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्करानं काश्मीर खो-यात दहशतवाद्यांविरोधातील कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे.

encounter between security forces and terrorists in baramulla | Jammu-Kashmir : बारामुल्ला परिसरात जवानांनी घेरलं दहशतवाद्यांना, चकमक सुरू

Jammu-Kashmir : बारामुल्ला परिसरात जवानांनी घेरलं दहशतवाद्यांना, चकमक सुरू

Next

श्रीनगर : सीमारेषेवर वारंवार होणा-या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्करानं काश्मीर खो-यात दहशतवाद्यांविरोधातील कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. शुक्रवारी (16 फेब्रुवारी) सकाळी बारामुल्ला परिसरातील पट्टन भागात जवानांनी काही दहशतवाद्यांना घेरले आहे. सध्या जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.  

यापूर्वी गुरुवारीदेखील ( 15 फेब्रुवारी ) दहशतवाद्यांनी कुपवाडा येथील अवंतीपुरातील CRPF कॅम्पवर हल्ला केला होता. अवंतीपुरातील CRPF कॅम्प हे पंजगाव रेल्वे स्टेशनजवळ स्थित आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलातील जवानांनी परिसराला चहुबाजूंनी घेराव घातला होता. रात्री उशीरापर्यंत परिसरात शोध मोहीमदेखील चालवण्यात आली होती.  

करन नगर परिसरातील लष्करी तळावर दहशतवादी हल्ला
करन नगर येथील भारतीय लष्कराच्या तळावर मंगळवारी ( 13 फेब्रुवारी ) दहशतवादी हल्ला करण्यात आला.  तब्बल 30 तास सुरू असलेल्या चकमकीनंतर भारतीय जवानांनी इमारतीत लपलेल्या दोन दहशतवाद्यांना ठार केले. चकमक संपल्यानंतर भारतीय जवानांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. त्यावेळी दहशतवाद्यांच्या मृतदेहांशेजारी दोन एके-47 रायफल्स आणि आठ काडतुसं मिळाली. मात्र, त्यांच्या बॅगेत कोणतेही खाण्याचे पदार्थ किंवा औषधे मिळाली नाहीत.

हे दोघेही लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी असल्याची माहिती सीआरपीएफचे पोलीस महानिरीक्षक रविदीप साही यांनी दिली. दहशतवाद्यांकडे खाण्याचे पदार्थ किंवा औषधे न सापडणे ही थोडीशी विचित्र गोष्ट आहे. कारण, एखाद्या ठिकाणी बराच काळ ठाण मांडून बसायचे असेल तर दहशतवादी शक्यतो स्वत:जवळ खाण्याचे पदार्थ किंवा औषध बाळगतात. मात्र, असा प्रकार घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही, असेही लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटले. 

हल्ल्याची किंमत पाकिस्तानला चुकवावी लागणार - निर्मला सीतारमण

जम्मूतील सुंजवां येथील लष्करी तळ आणि करन नगर परिसरातील सीआरपीएफ मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. सुंजवां येथील लष्कर तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 6 जवान शहीद झाले होते आणि काही जण जखमीदेखील झाले होते. सीतारमण यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी सीतारमण यांनी पाकिस्तानला या हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशाराच दिला. पत्रकार परिषद घेत सीतारमण यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती.  ''सुंजवांमधील हल्ला हा जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरने घडवून आणला आहे. भारत पाकिस्तानला दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्येकवेळी पुरावा देत आहे. मात्र, याची फिकीर पाकिस्तानला नाही त्यामुळे त्यांना आता याची किंमत चुकवावी लागेल'', असे सीतारमण यांनी यावेळी म्हटले. 

जखमी गर्भवतीने दिला मुलीला जन्म
सुंजवांतील लष्करी तळाजवळ निवासी भागात चकमक सुरू असताना, यात एक गर्भवती महिला जखमी झाली. राइफलमॅन नजीर अहमद आणि त्यांच्या गर्भवती पत्नी हे गोळीबारात जखमी झाले. त्यांना तत्काळ सैन्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या महिलेचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. या महिलेने एका मुलीला जन्म दिला. आई व मुलीची प्रकृती चांगली आहे.

पाकिस्तानशी चर्चा करा
हिंसाचार थांबविण्यासाठी पाकिस्तानशी चर्चा करा अशी मागणी जम्मू -काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केली आहे. विधानसभेत त्या म्हणाल्या की, जर फारुख अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांनी पाकिस्तानशी चर्चा करण्याची मागणी केली तर त्यांना राष्ट्रविरोधी म्हटले जाते. मात्र, या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी चर्चेशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही. या मुद्यावर आम्ही म्हणजे काश्मिरींनी चर्चा नाही करायची तर, कोण चर्चा करणार?

पाक करणार कारवाई
इस्लामाबाद : लष्कर-ए-तय्यबा, अल-कायदा, तालिबान अशा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना व दहशतवादी लोकांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने पाकिस्तान सरकारने दहशतवादविरोधी कायद्यात दुरुस्ती केली आहे. त्या संदर्भात काढलेल्या एका अध्यादेशावर त्या देशाचे अध्यक्ष ममनून हुसैन यांनी स्वाक्षरी केली.



 



 

Web Title: encounter between security forces and terrorists in baramulla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.