अबकी बार, मुश्किल है यार! 2019 साठी भाजपाची वाट बिकट 

By Balkrishna.parab | Published: May 31, 2018 04:01 PM2018-05-31T16:01:05+5:302018-06-03T11:02:03+5:30

सर्वसामान्यांमध्ये निर्माण होत असलेला असंतोष तसेच विरोधकांची देशपातळीवर होत असलेली एकजुट भाजपासाठी डोकेदुखी ठरणार असून, अबकी बार मुश्किल है यार, असे म्हणण्याची वेळ नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर आली आहे. 

Difficult challenge to Modi & Shah | अबकी बार, मुश्किल है यार! 2019 साठी भाजपाची वाट बिकट 

अबकी बार, मुश्किल है यार! 2019 साठी भाजपाची वाट बिकट 

googlenewsNext

चार लोकसभा मतदारसंघांसह 14 विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीत पालघर लोकसभा आणि थराली विधानसभा मतदारसंघ तसेच नागालँडमध्ये भाजपाच्या मित्र पक्षाने राखलेली लोकसभेची जागा वगळता  इतर सर्वत्र भाजपाचा धुव्वा उडाला. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या कैराना आणि भंडारा गोंदिया मतदारसंघातही भाजपाची दाणादाण उडाली. केंद्रात आणि बहुतांश राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या प्रभावक्षेत्रामध्ये या निवडणुका होत असल्याने सरकारच्या कामगिरीबाबत जनमताचा कौल म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारसह भाजपाशासित राज्यांमधील सरकारांबाबत असलेली नाराजी मतदारांनी मतपेटीतून व्यक्त केल्याचा सर्वसाधारण निष्कर्श या निकालांमधून काढता येते. 
 चार लोकसभा मतदारसंघांसह 14 विधानसभा मतदारसंघातील या पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र, केरळ, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, मेघालय, नागालँड, पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये मतदान झाले. तर कर्नाटक विधानसभेच्या एका जागेसाठीही मतदान झाले होते. मात्र या निवडणुकीत राजकीय वर्तुळाचे सर्वाधिक लक्ष होते ते महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील निकालांवर. त्यामध्ये महाराष्ट्रातील पालघरची जागा भाजपाने कशीबशी राखली. पण भंडारा गोंदिया आणि उत्तर प्रदेशमधील कैराना मतदारसंघात त्यांना सपाटून मार खावा लागला. भंडारा गोंदिया मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील आघाडी निर्णायक ठरली. तर उत्तर प्रदेशमधील कैराना मतदारसंघात राष्ट्रीय लोकदल, सपा, बसपा आणि काँग्रेस अशा विरोधी पक्षांच्या एकजुटीने भाजपाला भुईसपाट केले. तर नूरपूरमध्ये अटीतटीच्या लढाईत सपाने भाजपा उमेदवाराला पराभूत केले.  तिकडे बिहारमध्ये तेजस्वी यादवांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय जनता दलाने भाजपा आणि जेडीयू आघाडीला पराभूत करत जोकिहाट मतदारसंघ जिंकला. तर झारखंडमध्ये  झारखंड मुक्ती मोर्चाने गोमिया आणि सिल्ली मतदारसंघात भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षाला पराभवाचा धक्का दिला. 
या निकालांकडे पाहिल्यानंतर विरोधी पक्षांची एकजूट भाजपाला भारी पडत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भातील भंडारा गोंदिया मतदासंघात भाजपाचा विजय होईल असे मानले जात होते. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केलेली आघाडी भाजपाला भारी पडली. त्यातही शेतकऱ्यांसह विविध वर्गांमध्ये असलेला रोषही भाजपाच्या पराभवाचे कारण ठरला.  पालघरमध्ये भाजपाला विजय मिळाला खरा. पण शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीने भाजपासमोर उभे केलेले आव्हान लक्षणिय होते. त्यामुळे येथील भाजपाच्या विजयापेक्षा शिवसेना आणि बविआने त्यांना दिलेली झुंज पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीने अधिक प्रभावी ठरणार आहे. तसेच या निवडणुकीत शिवसेनेने आपले उपद्रव मूल्यही दाखवून दिले आहे. त्यामुळे बदलत्या राजकीय वातावरणात भाजपासाठी युती अपरिहार्य बनली आहे.  
 2014 साली भाजपाच्या मोठ्या विजयात उत्तर प्रदेशने निर्णायक भूमिका बजावली होती. मात्र सपा, बसपा, काँग्रेस आणि लोकदल अशा पक्षांच्या झालेल्या एकजुटीने 2019 मध्ये भाजपाची वाट बिकट झाली आहे. विरोधी मतांच्या ऐक्यामुळेच कैराना मतदार संघात राष्ट्रीय लोकदलाच्या उमेदवार तबस्सूम हसन यांना मोठा विजय मिळवणे शक्य झाले. तसेच गोरखपूर आणि फूलपूरपाठोपाठ उत्तर प्रदेशातील अजून एक लोकसभा मतदारसंघातून भाजपाची गच्छंती झाली. आता उत्तर प्रदेशात विरोधकांनी अशीच एकजूट कायम राखल्यास 2019मध्ये येथे भाजपाला एकेका जागेसाठी झुंज द्यावी लागण्याची शक्यता आहे. 
 विरोधी ऐक्यामुळे मतांचे गणित बदलत असतानाच मतदारांच्या मनात असलेली सुप्त नाराजीही भारतीय जनता पक्षाला भोवत आहे याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी कितीही मोठमोठ्या घोषणा करत असले. तसेच भाजपाकडून देशात सुरू असलेल्या विकासकामांचे दाखले दररोज देण्यात येत असले तरी सर्वसामान्यांपर्यंत विकासाचे लाभ म्हणावे तसे पोहोचलेले नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारने साफ निराशा केली आहे. बलात्काराच्या घटना, दलितांच्या प्रश्नांबाबत सरकारच्या भूमिकेमुळे नाराजीत भर पडली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांत सातत्याने वाढत चाललेले पेट्रोल आणि डिझेलचे भाव यामुळे सर्वसामान्य होरपळत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये निर्माण होत असलेला असंतोष तसेच विरोधकांची देशपातळीवर होत असलेली एकजुट भाजपासाठी डोकेदुखी ठरणार असून, अबकी बार मुश्किल है यार, असे म्हणण्याची वेळ नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर आली आहे. 

Web Title: Difficult challenge to Modi & Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.